www.24taas.com, नवी दिल्ली
राजधानीत संसदेच्या मान्सून अधिवेशनाला आजपासून सुरुवात होतेय. आसाम हिंसेचा प्रश्न आपण पहिल्याच दिवशी दोन्ही सभागृहात उठवणार असल्याचं भाजपानं आधीच स्पष्ट केलंय. आसाम हिंसेच्या प्रश्नावर भाजपाकडून स्थगन प्रस्तावाची मागणीदेखील करण्यात येणार असल्याचं समजतंय. चिंदबरम यांच्यासोबतच महागाई, आर्थिक संकट आणि दुष्काळ यांसारख्या प्रश्नांवरही सरकारला घेरण्याचा चंग विरोधकांनी बांधलाय.
नवे अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी रविवारी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली होती. त्यानंतर मंगळवारी त्यांनी राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते अरुण जेटली यांची भेट घेतलीय. संसद भवनाच्या आवारात असलेल्या जेटली यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेण्यामागे चिदंबरम यांनी स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी भाजप नेत्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. लोकसभेच्या विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज यांचीही भेट चिदंबरम घेण्याची शक्यता आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात भाजपसहित इतर विरोधी पक्षांनी दोन्ही सदनात चिदंबरम यांच्यावर बहिष्कार घातला होता.
आसाम प्रश्नावर लोकसभेत भाजप नेते लालकृष्ण अडवाणी स्थगन प्रस्ताव मांडणार आहेत तर राज्यसभेत भाजप नेते रविशंकर प्रसाद आणि बलबीर पुंड स्थागन प्रस्तावाची मागणी करणार आहेत. मागणी मान्य न झाल्यात गोंधळ होऊन पहिल्याच दिवशी कामकाज तहकूब झालं तर आश्चर्य वाटायला नको.
.