झी २४ तास वेब टीम, चेन्नई/ढाका
बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूत जोरदार वादळ घुसण्याची शक्यता आहे. येत्या ४८ तासात तुफानी वादळाचा सामना करावा लागेल, अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने बंगालच्या खाडीत मोठे वादळ घोंगावण्याची शक्यता वर्तविण्यात आलीय. या वादळामुळे समुद्र किनाऱ्यावर मोठ्या लाटा उसळण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तसेच या वादळाने मोठे नुकसान होऊ शकते. कोणीही समुद्रात मासेमारी करण्यास जाऊ नये, असा धोक्याचा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, वादळाच्या पार्श्वभूमिवर बांग्लादेशने हाय अलर्ट जारी केला आहे. हे वादळ दक्षिणेकडून वेग घेईल. हे वादळ चटगाव बंदरापासून १२०० किलोमीटर दूर आहे. मात्र, हे वादळ अधिक तीव्र होऊन पश्चिम दिशेकडे मार्गक्रमण करील. या वादळाचा धोका लक्षात घेता मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात न जाता आपल्या नौका किनाऱ्यावर उभ्या करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.