www.24taas.com, नवी दिल्ली
डबघाईला आलेली अर्थव्यवस्था, रुपयाची घसरण आणि महागाई अशा वातावरणात विकासाला चालना देण्यासाठी सरकारनं पावलं उचलायला सुरुवात केली आहेत. काही महत्त्वाच्या घोषणा पंतप्रधानांनी केल्या आहेत. त्यामध्ये मुंबईत एलिव्हेटेड कॉरिडोअरचाही समावेश आहे.
दरवर्षी घसरणारा विकास दर लक्षात घेता विकासाशी संदर्भात सर्व क्षेत्राच्या मंत्र्यांची पंतप्रधानांनी एक बैठक बोलावली. सध्याच्या आर्थिक परिस्थितीवर चिंता व्यक्त करतानाच महागाई मोठं आव्हान असल्याचं पंतप्रधान म्हणाले. येत्या पाच वर्षांमध्ये विकासासाठी एक लाख कोटींच्या गुंतवणुकीची गरज आहे. विकासाला चालना देण्यासाठी काही धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेत.
यावर्षी साडे नऊ हजार किलोमीटरचे रस्ते तयार करण्यात येणार आहेत. मुंबईत एलिव्हेटेड रेल्वे कॉरिडॉरही बांधण्यात येईल. लखनौ, वाराणसी, गयासह पाच ठिकाणी इंटरनॅशनल एअरपोर्ट उभे राहतील. 18 हजार मेगावॅट अतिरिक्त वीज उत्पादन, नवी मुंबई, गोवा आणि कन्नूरमध्ये ग्रीन फिल्ड एअरपोर्ट प्रस्तावित आहेत. हे उद्दिष्ट साध्य करताना विविध मंत्रालयांमध्ये संघर्ष नको, असं पंतप्रधानांनी मंत्र्यांना बजावलंय.
सध्या देशामध्ये 1 लाख 45 हज़ार कोटींच्या योजना रखडलेल्या आहेत. आता या बैठकीनंतर तरी मंत्री कामाला लागणार का आणि विकासाची गाडी रुळावर येणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.