मराठी चित्रपटांचा नवा 'श्वास'

2004 मध्ये मराठी सिनेमाचा श्वास जणू परत मिळाला तो श्वासच्या अभूतपूर्व यशामुळे...श्वासला सुवर्णकमळ तर मिळालंच पण भारतातर्फे ऑस्करसाठीही या चित्रपटाची निवड झाली..त्यानंतर दर्जेदार मराठी सिनेमांची निर्मिती झपाट्याने वाढली

Updated: May 3, 2012, 11:14 PM IST

१९९०-२०१२

 

1990 च्या दशकाची सुरुवात झाली ती माहेरची साडी या भावपूर्ण विषयाच्या चित्रपटाने...स्त्रीकेंद्री विषयांची शृंखलाच या काळात पाहायला मिळाली...पण दशकाच्या सुरुवातीला स्त्रीवर होणारे अत्याचार याचंचं दर्शन प्रामुख्याने होत होतं...

 

दशकाच्या उत्तरार्धात मात्र महेश मांजरेकरांचा अस्तित्व हा सिनेमा आला आणि स्त्रीकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन या सिनेमाने बदलला...तब्बूच्या उत्तम अभिनयाने नटलेला हा सिनेमा मराठी सिनेसृष्टीत महत्वाचा बदल देणारा ठरला.नंतर आलेला बिनधास्तही आधुनिक स्त्रीचं रुप दाखवणारा ठरला. विनोदी सिनेमांचा रतीब एकीकडे सुरुच होता पण गंभीर विषयांची हाताळणीही पाहायला मिळत होती...एकवीसावं शतक मराठी सिनेमासाठी ख-या अर्थानं कात टाकणारं ठरलं...

 

2004 मध्ये मराठी सिनेमाचा श्वास जणू परत मिळाला तो श्वासच्या अभूतपूर्व यशामुळे...श्वासला सुवर्णकमळ तर मिळालंच पण भारतातर्फे ऑस्करसाठीही या चित्रपटाची निवड झाली..त्यानंतर दर्जेदार मराठी सिनेमांची निर्मिती झपाट्याने वाढली..समाजाचे विदारक चित्रणही सिनेमांमध्ये दिसू लागले...गाभ्रीचा पाऊस या सिनेमाने शेतक-यांच्या आत्महत्येसारखा करूण विषय मांडला तर टिंग्याने साकारलं एका छोट्या ग्रामीण मुलाचं भावविश्व...

याच काळात मराठी चित्रपटांना अनुदान मिळू लागलं त्यामुळे मराठी सिनेमांची निर्मिती झपाट्याने वाढू लागली..अनुदानप्राप्त सिनेमांमुळे मराठी प्रेक्षक सिनेमागृहात परतला...नवे विषय...नवी मांडणी...आधुनिक तंत्रज्ञान यांनी नटलेला मराठी सिनेमा दिवसेंदिवस समृद्ध होत गेला...

 

वळू, विहीर या उमेश कुलकर्णीच्या सिनेमांनी देशातच नाही तर परदेशातही नाव कमावलं...अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवात मराठी सिनेमाचं स्क्रिनिंग होऊ लागलं...मराठी सिनेमाची नोंद वैश्विक पातळीवर होण्याची ही सुरुवात होती...

 

हरीश्चंद्राची फॅक्टरी या परेश मोकाशी दिग्दर्शित सिनेमाने भारतीय सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा जीवनपट पडद्यावर आणला...तर अवधूत गुप्तेच्या झेंडाने राजकारणालाच हात घातला. नटरंगने महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेचं दर्शन घडवलं तर बालगंधर्वने संगीत रंगभूमीचा इतिहास जिवंत केला....

 

देऊळ या सिनेमाला सुवर्णकमळ मिळालं आणि मराठी सिनेमा पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर वाखाणला गेला..शाळा या सिनेमानेही राष्ट्रीय पुरस्कार तर पटकावलाच सोबत प्रेक्षकांची दिलखुलास पसंतीही मिळवली. नाविन्यपूर्ण विषय...आकर्षक मांडणी आणि दर्जेदार अभिनय यांनी नटलेल्या मराठी सिनेमांची ही यशस्वी घोडदौड अशीच सुरु राहील अशी आशा करूया..

 

Tags: