बिग बी आता नटसम्राट

कोणी घर देता का घर, हे 'नटसम्राट' या नाटकातील अप्पासाहेब बेलवलकरांचे वाक्य आता बिग बी अमिताभ बच्चन यांच्या तोंडी असणार आहे. ‘नटसम्राट’ या अजरामर कलाकृतीमधील असे अनेक संवाद महानायक अमिताभ बच्चनच्या धीरगंभीर आवाजात ऐकायला मिळणार आहेत.

Updated: May 18, 2012, 08:17 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

कोणी घर देता का घर, हे 'नटसम्राट' या नाटकातील अप्पासाहेब बेलवलकरांचे वाक्य आता बिग बी अमिताभ बच्चन यांच्या तोंडी असणार आहे.  ‘नटसम्राट’ या अजरामर कलाकृतीमधील असे अनेक संवाद महानायक अमिताभ बच्चनच्या धीरगंभीर आवाजात ऐकायला मिळणार आहेत.  अप्पासाहेब बेलवलकरांच्या भूमिकेने अमिताभलाही झपाटले असून नटसम्राटवरून तयार करण्यात येत असलेल्या चित्रपटात ही भूमिका करण्यास तो सज्ज झाला आहे.

 

महेश मांजरेकर हा चित्रपट तयार करीत आहेत. मराठी रंगमंचावर गाजलेली भूमिका रुपेरी पडद्यावर अमिताभ पहिल्यांदाच साकारणार आहे. कुसुमग्रजांच्या ‘नटसम्राट’ ने मराठी नाटयसृष्टीचे आयामच बदलून टाकले. नानासाहेब फाटक, श्रीराम लागू, यशवंत दत्त, चंद्रकांत गोखले, दत्ता भट, चित्तरंजन कोल्हटकर, मधूसूधन कोल्हटकर, राजा गोसावी, सतीश दुभाषी आणि उपेंद्र दाते या कलाकारांनी अप्पासाहेब बेलवलकरांच्या भूमिकेचे आव्हान पेलले आहे.

 

महेश मांजरेकर गेले वर्षभर या नाटकावरुन चित्रपटाची पटकथा करण्यामध्ये व्यस्त होते आणि अखेर ते काम पूर्ण झाल्यावर त्यांनी गेल्या आठवड्यात अमिताभ यांना पटकथा वाचायला दिली. या भूमिकेने बच्चन यांना आकर्षित केले नसते तरच नवल! नाटकातला नट आणि सध्याचं वास्तव यांच्यातलं भान सुटलेली सरत्या वयातली बेलवलकर ही गाजलेली व्यक्तिरेखाअशा दिग्गज्जांनी नुसतीच पेलली नाही तर या नटांनी आपला स्वत:चा ठसा उमटवला.

 

करिअरच्या या वळणावर अमिताभ यांना भूमिकेचं असे आव्हान हवे होते आणि ते त्यांनी स्वीकारल्याचे मांजरेकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता नटसम्राटाच्या भूमिकेत बिग बी दिसणार आहे.  अमिताभ प्रथमच मराठीतील कलाकृतीवर बेतलेल्या चित्रपटात काम करणार आहेत.