पटकथाकार-निर्माते ओपी दत्तांचे निधन

ख्यातनाम बॉलिवुड पटकथाकार आणि निर्माते ओपी दत्ता यांचे अंधेरीच्या कोकिलाबेन रुग्णालयात न्युमोनियाच्या आजाराने निधन झालं

Updated: Feb 10, 2012, 05:17 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

ख्यातनाम बॉलिवुड पटकथाकार आणि निर्माते ओपी दत्ता यांचे अंधेरीच्या कोकिलाबेन रुग्णालयात न्युमोनियाच्या आजाराने निधन झालं. डॉक्टर राम नारायण यांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री साडे नऊच्या सुमारास दत्ता यांचे निधन झालं. दत्ता यांना सात फेब्रुवारीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

 

ओपी दत्ता यांनी आपल्या कारकिर्दीची सुरवात १९४८ साली प्यारी की जीत या सिनेमाच्या दिग्दर्शनाने केली. त्यानंतर त्यांनी सूरजमुखी (१९५०), एक नजर (१९५१), मालकिन (१९५३), आंगन (१९५९) या सिनेमांचे दिग्दर्शन केलं.

 

दत्ता यांनी आपला मुलगा जेपी दत्तांच्या गुलामी (१९८५), हथियार (१९८९), बॉर्डर (१९९७), रिफ्यूजी, एलओसी कारगिल या सिनेमासाठी पटकथा लिहिल्या. त्यांनी २००६ साली उमराव जानच्या रिमेकसाठी शेवटची पटकथा लिहिली. अभिषेक बच्चनने त्यांच्या रिफ्यूजी सिनेमातून पदार्पण केलं. अभिषेक बच्चनने टविटद्वारा आपला शोक व्यक्त केला आहे.