ज्येष्ठ अभिनेते देव आनंद यांच्या पार्थिवावर लंडन येथेच अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. देव आनंद यांचे निकटवर्तीय यांनी ही माहिती दिली. देव आनंद यांच्या पार्थिवावर लंडन येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याने त्यांचे पार्थिव भारतात आणण्यात येणार नाही.
ज्येष्ठ कलाकार, प्रसिद्ध अभिनेते देवानंद यांचे आज लंडन येथे ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. लंडन येथे चेकअप साठी गेले असता देवानंद यांना हद्यविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 88 होते.
अखेरच्या क्षणी देवानंद यांच्यासोबत त्यांचा मुलगा सुनील आनंद होता. देवानंद यांचा जन्म २६ सप्टेंबर १९२३ रोजी पंजाबमध्ये गुरुदासपूर जिल्ह्यात झालेला, देवानंद यांचे मूळ नाव देवदत्त पिशोरीमल आनंद असे होते. लाहोरच्या प्रसिद्ध सरकारी कॉलेजमध्ये १९४२ मध्ये इंग्रजी साहित्यात ग्रॅज्युएशन केले.
शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी चर्चगेट येथे लष्कराच्या ऑफिसमध्ये काही काळ कारकून पदावर नोकरी सुरू केली. अल्पावधीतच नोकरी सोडून त्यांनी सिनेमा क्षेत्रात प्रवेश केला. प्रभात कंपनीचा ‘ हम एक है ’ हा त्यांचा पहिला सिनेमा. पण या निमित्ताने पण सिनेमासृष्टीतल्या देवानंद यांच्या ओळखी वाढल्या. पुढे १९४८ मध्ये देवानंद यांचा जिद्दी हा सिनेमा प्रचंड लोकप्रिय झाला. याच सिनेमाच्या यशानंतर देवानंद यांनी नवकेतन फिल्म कंपनी सुरू केली आणि सिनेमा निर्मितीच्या क्षेत्रात प्रवेश केला.
देवानंद यांचे मुनीम जी, दुश्मन, कालाबाजार, सी. आय. डी., पेइंग गेस्ट, गॅम्बलर, तेरे घर के सामने, काला पानी हे सर्वच सिनेमे देखील प्रचंड गाजले. या यशामुळे देवानंद सुपरस्टार झाले. जाल, गाइड, तेरे मेरे सपने, छुपा रुस्तम, हरे रामा हरे कृष्णा, हिरा पन्ना, देश परदेस, लूटमार, स्वामी दादा, सच्चे का बोलबाला, अव्वल नंबर या सिनेमांमुळे देवानंद सतत चर्चेत राहिले.
सिनेनिर्मिती सोबतच देवानंद यांनी सिनेमाचे पटकथा लेखन करण्याचाही प्रयोग केला. आंधिया, हरे रामा हरे कृष्णा, हम नौजवान, अव्वल नंबर, प्यार का तराना, गँगस्टर, मै सोलह बरस का, सेन्सॉर या सिनेमांसाठी देवानंद यांनीच पटकथालेखन केले.
देवानंद शेवटपर्यंत त्यांच्या कामामध्ये व्यस्त होते. त्यांनी शेवटपर्यंत सिनेसृष्टी सेवा केली. बॉलिवूडमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाने एक वेगळा ठसा उमटवला होता, त्यांच्यावर चित्रीत झालेली अनेक गाणी आजही गुणगुणली जातात, गाता रहे मेरा दिल, मै जिंदगी का साथ निभाता चला गया, ये दिल ना होता बिचारा. ह्या गाण्यांनी एक काळ अक्षरश: गाजवून सोडला होता.