अमरावतीत पैसे काँग्रेसनं पाठवले - पोलीस आयुक्त

अमरावतीमध्ये नाकाबंदीदरम्यान जप्त केलेली रक्कम काँग्रेसनं पाठवल्याच्या पोलीस आयुक्तांच्या स्पष्टीकरणानंतर खळबळ उडाली आहे. त्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

Updated: Feb 12, 2012, 10:55 PM IST

www.24taas.com, अमरावती

 

अमरावतीमध्ये नाकाबंदीदरम्यान जप्त केलेली रक्कम काँग्रेसनं पाठवल्याच्या पोलीस आयुक्तांच्या स्पष्टीकरणानंतर खळबळ उडाली आहे. त्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. ही रक्कम एका पक्षाची असल्याचा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.

 

या राष्ट्रीय पक्षाचा अमरावती आयुक्तांवर दबाव असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाकडं तक्रार करणार असल्याचं पवारांनी म्हटलं आहे. भाजपनंही या प्रकरणात एक राज्यमंत्री गुंतला असल्याची टीका केली आहे. यावरून आता आयोगाकडं भाजप दाद मागणार आहे.

 

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही एक कोटींची रक्कम अमरावतीतून जप्त केली होती. MH-31-DC 4744 या नंबरच्या फोर्ड  गाडीतून ही कॅश घेऊन शहरात प्रवेश करत असताना पोलिसांनी ही रक्कम जप्त केली होती.

 

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातली ही गाडी असल्याची सूत्रांची माहिती आहे. या प्रकरणी प्रकाश मसराम आणि आशिष बोधनकर या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. अमरावती प्रदेश काँग्रेस कमिटीनं निवडणूक खर्चासाठी ही रक्कम दिल्याची माहिती अमरावतीचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.