Zee 24 Taas Impact: मरोळ येथील आर्या गोल्ड कंपनीत मराठी माणसांना नोकरी नाकारत असल्याची बातमी सर्वप्रथम 'झी 24 तास'ने समोर आणली होती. यानंतर मराठी जनांमधून संतापाची लाट उसळली होती. दरम्यान मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी लढा देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आर्या गोल्ड या कंपनीला भेट दिली. मनसे पदाधिकाऱ्यांसमोर आर्या गोल्डच्या मालकाने मराठी माणसांची माफी मागितली आहे. मी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागतो, अशा शब्दात आर्या गोल्ड कंपनीच्या मालकांने माफी मागितली आहे.
मनसे नेते राज परते यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह मरोळ येथील 'आर्या गोल्ड' कंपनीला भेट दिली. त्यांनी कंपनीच्या मालकाला चांगलच खडसावलं. मनसे नेत्यांचा आक्रमकपणा पाहून त्या मालकाने नरमाईची भूमिका घेतली आणि सर्वांसमोर हात जोडून माफी मागितली. आम्हाला नॉन महाराष्ट्रीयन उमेदवार हवेत, हे आमच्याकडून चुकीने टाकलं गेलंय. यासाठी मी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची माफी मागतो, असे त्यांनी म्हणाले.
एवढा पगार आणि अशी नोकरी आहे फक्त महाराष्ट्रीयन सोडून, असा स्पष्ट उल्लेष त्यात आहे. या कंपनीमध्ये पुर्वी मराठी कामगार कामाला होते. आता त्यांना अमराठी कामगार हवेयत. हा प्रकार मनसे खपवून घेणार नाही, अशी प्रतिक्रिया मनसे नेते केतन नाईक यांनी दिली.
आमचे अंधेरीचे पदाधिकारी तिथे पोहोचतील.आमच्या साहेबांचे स्पष्ट आदेश आहेत, मराठीची गळचेपी होत असेल तर हात जोडून नव्हे तर हात सोडून काम करायचे आदेश आहेत, अशी प्रतिक्रिया मनसेचे नेते अभिजीत पानसे यांनी दिली होती. दरम्यान अंधेरीच्या पदाधिकाऱ्यांनी तिथे पोहोचून आर्या गोल्डच्या मालकाला माफी मागायला लावली.
इनडीड या नोकरीबद्दल माहिती देणाऱ्या वेबसाइटवर एक जाहिरात प्रसिद्ध झालीय. मरोळ येथील आर्या गोल्ड नावाच्या कंपनीतील डायमंड फॅक्टरीमध्ये प्रोडक्शन मॅनेजरची रिक्त जागा भरली जाणार आहे. या पदावर काम करणाऱ्याला दरमहा 25 हजार ते 62 हजार 760 रुपये इतका पगार दिला जाणार आहे.ही नोकरी पूर्ण वेळ असून दिवसाच्या शिफ्टमध्ये काम चालणार आहे. यासाठी 5 वर्ष अनुभव असलेला पुरुष उमेदवार त्यांना हवाय. इथपर्यंत वाचून तुम्हाला सर्वकाही ठिक आहे, असंच वाटेल. पण यापुढे जे लिहिलंय चे वाचून तुम्हाला संताप अनावर होईल. कारण नोकरीच्या तपशीलामध्ये पुढे नॉन महाराष्ट्रीय असा उल्लेख करण्यात आला आहे. या नोकरीसाठी केवळ महाराष्ट्रीयन नसलेले उमेदवार अर्ज करु शकतात, असा उल्लेख यात स्पष्टपणे करण्यात आलाय. मुंबईतील मरोळमध्ये ही नोकरी असून यांना महाराष्ट्रीयन नसलेला उमेदवार का हवाय? हे न उलगडणारं कोडं आहे. आम्ही या प्रकरणाच्या खोलात जाण्याचा प्रयत्न केला. इनडीडवर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर आम्ही फोन केला. तेथे एक व्यक्ती बोलत होती. मी महाराष्ट्रीयन आहे तर मला नोकरी मिळेल का? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. पण त्याला याबद्दल माहिती नव्हती. संबंधित कंपनीतील एचआर सविस्तर सांगेल, असे म्हणून त्याने एका लॅण्डलाईनचा नंबर दिला. लॅण्डलाईन नंबरवर फोन केला रिसेप्शनवर फोन लागला. एचआरशी थेट बोलता येणार नाही, असे त्यांनी सांगितले. तुमची माहिती आम्हाला व्हॉट्सअॅप करा, ती आम्ही एचआरला पाठवू, त्यानंतर त्या फोन करतील, असे उत्तर समोरुन देण्यात आले.