मुंबई : विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू होत आहे. कायद्यावर टिकणारा मराठा समाजासाठीचा आरक्षणाचा कायदा अधिवेशनात मांडण्याचं आव्हान राज्य सरकारपुढे आहे. पहिल्या आठवड्यातच मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत चर्चा होत निर्णय केला जाणार आहे. धनगर समाजाची स्थिती सांगणा-या TISS च्या अहवालाबाबत राज्य सरकार निर्णय जाहीर करणार आहे. मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा मुद्दाही डोके वर काढणार आहे. एकूण १३ नवी विधेयकं या अधिवेशनात मांडली जाणार आहेत.
विधानसभेत ८ तर विधान परिषदेत २ प्रलंबित विधेयकं आहेत, ती मंजूर केली जातील. दुष्काळाची चर्चा अधिवेशनात होणार आहे.
टी वन वाघीण, अघोषित भारनियमन, कायदा सुव्यवस्था, उत्तर महाराष्ट्र- मराठवाडा पाणीवाद या मुद्द्यांवरूनही खडाजंगी होणार आहे.
या आरक्षणाच्या प्रमुख मुद्दासह टी वन वाघिणीची हत्या, राज्यातील अघोषित भारनियमन, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, उत्तर महाराष्ट्र - मराठवाडा पाणी वाटप वाद आणि अर्थात दुष्काळ समस्या अशा मुद्द्यांवरही विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी होणार आहे.
त्यातच सातवा वेतन आयोगाच्या अंमलबजावणीचा भार डोक्यावर असलेल्या सरकारला यावेळीही पुरवणी मागण्या मांडायच्या आहेत.
त्यामुळे हे हिवाळी अधिवेशन याधीच्या अधिवेशनापेक्षा काहीसं अधिकच गाजणार यात शंका नाही.