मुंबई : मनसेचे आमदार राजू पाटील हे उद्याच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराच्या वादात एक वेगळी भूमिका मांडली होती. नवी मुंबईचं विमानतळ हे मुंबई विमानतळाचाच एक भाग असल्याने त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं जावं. अशी मागणी त्यांनी केली होती. यानंतर भूमिपुत्रांच्या या आंदोलनात मनसेचे आमदार राजू पाटील सहभागी होणार की नाही असा प्रश्न उपस्थित झाला होता. पण राजू पाटील यांनी यावर त्यांची भूमिका स्पष्ट केली.
राजू पाटील यांनी म्हटलं की, मा. राजसाहेब ठाकरे यांनी नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाबाबत वस्तुनिष्ठ तांत्रिक बाजू मांडली आहे. त्यानंतर अनेकजण विपर्यास करुन त्याचा वेगळा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला गेला. राहिला प्रश्न २४ जूनच्या आंदोलनाचा. तर मी नम्रपणे आणि ठामपणे सांगू इच्छितो की हा मोर्चा आगरी, कोळी, कुणबी, कऱ्हाडी आणि शेकडो वर्षांचा इतिहास असलेल्या भूमीपुत्रांनी काढलेला मोर्चा आहे. राज्यभर जेव्हा मराठा आरक्षणासाठी लाखोंचे मूकमोर्चे निघत होते, तेव्हा जनभावना आणि सामाजिक जबाबदारी म्हणून आंदोलनात सहभागी झालो होतो.'
'आताच्या घडीला तर माझा पूर्ण समाज या आंदोलनात उतरला आहे. त्यांच्या भावनेचा आणि विचारांचा कुटुंबातील एक सदस्य आणि लोकप्रतिनिधी म्हणून मला आदर आहे. कारण त्यांच्या प्रेमामुळेच आपण इथवर पोहोचलो आहोत. त्यामुळे राजकारणात असलो तरी लोकभावना आणि समाजकारण हेच माझं पहिलं प्राधान्य आहे. म्हणूनच ज्यांनी माझ्या संपूर्ण समाजाला आणि भूमिपुत्रांना रस्त्यावर उतरण्यासाठी भाग पाडलंय, त्यांचा निषेध करण्यासाठी आणि भूमीपुत्रांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी या मोर्चात सहभागी होणार आहोत.' अशी भूमिका राजू पाटील यांनी स्पष्ट केली आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी उद्या आगरी कोळी समाजाचे नेते आणि लोकं नवी मुंबई सिडको भवनला घेराव घालणार आहेत. कल्याण- डोंबिवली पालघर, वसई, ठाणे अशा विविध परिसरातूनही अनेक जण या घेराव आंदोलनात सहभागी होणार आहेत.