मुंबई : उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड या नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने भरघोस मतांनी विजय मिळवला. भाजपच्या (BJP) या विजयानंतर विरोधाकांनी पुन्हा एकदा ईव्हिएम (EVM) मशीनबाबत संशय व्यक्त केला आहे.
महाविकास आघाडी सरकरमधल्या (Mahavikas Aghadi Government) मंत्र्यांनीही ईव्हीएमबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. जनतेमध्ये आणि पक्षांमध्ये इव्हिएम मशीनबाबत संशयाचं वातावरण पाहायला मिळतंय, त्यामुळे राज्यातील महानगरापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेटपेपरवर व्हाव्यात असं मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी म्हटलं आहे.
चंद्रकांत पाटील यांचं उत्तर
जितेंद्र आव्हाड यांच्या या मागणीला भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. लोकशाहीत कोणालाही आपलं म्हणणं मांडता येतं, हेच तर लोकशाहीचं खरं सौंदर्य आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ज्यांनी ईव्हीएमबाबत तक्रार आहे, त्यांनी संबंधित यंत्रणेकडे जाऊन आपलं म्हणणं मांडावं, असं सांगत चंद्रकांत पाटील आणि ईव्हीएम, बॅलेट पेपर कशाला लोकांनी हात वर करुन निवडणुका घेतल्या तरी भाजप आणि मोदीच येतील असा दावा केला आहे.
चोर सोडून संन्याशाला फाशी
दरम्यान पोलिसांच्या बदल्यांसंदर्भात मुंबई पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या नोटीसीवरुनही चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. हा प्रकार म्हणजे चोर सोडून संन्याशआला फाशी देण्यासारखा आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.