मुंबई : विधानसभेत सावरकरांचा गौरव करण्याची मागणी करणारा भाजपचा प्रस्ताव फेटाळण्यात आला. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी नियमात बसत नसल्याचा सांगत हा प्रस्ताव फेटाळून लावला. यावर बोलताना अजित पवारांनी भाजपवर निशाणा साधला.
'आपलं कामकाज प्रथेप्रमाणे चालतं. आजच सावरकरांचा स्मृतीदिन आलेला नाही. देवेंद्र फडणवीस पाच वर्ष मुख्यमंत्री असताना हा प्रस्ताव आला नाही. सावरकर स्वातंत्र्यातील महान नेते आणि थोर देशभक्त आहेत. स्मृतीदिनाच्या निमित्ताने मी त्यांना आदरांजली अर्पण करतो,' असं अजित पवार म्हणाले.
'विरोधकांना वेगवेगळे मुद्दे काढून राजकीय स्वार्थ साधायचा आहे का? नरेंद्र मोदी मागची पाच वर्ष पंतप्रधान होते आणि आजही आहेत. २० ऑगस्ट २०१८ आणि १७ जानेवारी २०१९ ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आणि सावरकरांना भारतरत्न द्यायची मागणी केली. मग सावरकरांना भारतरत्न का दिलं जात नाही?' असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला.
देशाच्या पंतप्रधानांना सावरकरांना भारतरत्न देण्यासाठीचा प्रस्ताव पाठवलेला आहे. त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, आम्हीही करतो, असं आवाहन अजित पवारांनी भाजप नेत्यांना केलं.
'जेवढ्या व्यक्ती तेवढी मतं असू शकतात, पण त्यांचं योगदान कुणीही विसरू शकत नाही. ते विज्ञानवादी होते. ते गाई आणि बैलांबद्दल काय सांगत होते, ते सगळ्यांना माहिती आहे. ती भूमिका सगळ्या जनतेला पटलीच पाहिजे असं नाही,' असं मत अजित पवारांनी मांडलं.