मुंबई : शिवसेना उपनेते आणि महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी सकाळी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली आहे. यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव या भायखळा विधानसभा मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. तर, मुलगा निखिल जाधव युवासेनेचा कार्यकारिणी सदस्य आहे.
आयकर विभागाच्या छापेमारीमुळे चर्चेत आलेले यशवंत जाधव हे माझगावचे शाखाप्रमुख होते. १९९१ साली छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडल्यानंतर बाळा नांदगावकर आणि यशवंत जाधव यांनी माझगावचा किल्ला सांभाळला होता. १९९५ मध्ये भुजबळ यांचा बाळा नांदगावकर यांनी पराभव केला. तर, १९९७ मध्ये यशवंत जाधव यांनी पालिका निवडणूक जिंकून नगरसेवक म्हणून मुंबई महानगरपालिका सभागृहात प्रवेश केला.
राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाची स्थापना केली. त्यावेळी बाळा नांदगावकर यांनी शिवसेना सोडून मनसेत प्रवेश केला. यावेळी माझगाव विधानसभेची सारी सूत्रे यशवंत जाधव यांच्या हाती आली. २००९ मध्ये त्यांनी विधानसभेची निवडणूक लढविली. पण ते पराभूत झाले.
त्यांनतर २०१२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीच्या रणांगणात यशवंत जाधव आणि त्यांची पत्नी यामिनी जाधव उतरले होते. यावेळी यशवंत यांचा पराभव झाला तर यामिनी विजयी झाल्या होत्या. यामिनी जाधव यांनी नगरसेविका म्हणून महापालिकेच्या बाजार व उद्यान समिती, शिक्षण समिती आणि जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून काम पहिले आहे.
२०१७ मध्ये यशवंत जाधव पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आले. यावेळी त्यांना सभागृह नेता म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानंतर 1997 ते 2002 आणि 2009 ते 2012 या काळात स्थायी समिती सदस्यपदाचा अनुभव लक्षात घेता २०१९ मध्ये स्थायी समिती अध्यक्षपद देण्यात आले.
पूर्वीचे माझगाव आणि आताचे भायखळा विधानसभा मतदार संघात यशवंत जाधव यांचे प्राबल्य आहे. विरोधी पक्षात असलेल्या अनेक विरोधकांना यशवंत जाधव यांनी शिवसेनेत आणत शिवसेना वाढविली आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपानंतर जाधव यांच्या घरावर छापे मारण्यात आले आहेत. 15 कोटींचा घोटाळा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. ती रक्कम युएईला ठेवल्याची चर्चा असल्यामुळे ही धाड टाकण्यात आल्याची माहिती आहे.