मुंबई : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत टेस्ला कारचे मालक एलन मस्क यांचा समावेश होतो. एलन मस्क यांना अंतराळातही मोठी रुची आहे. त्याचबरोबर त्यांच्या टेस्ला कार जगभरात प्रसिद्ध आहेत. टेस्ला कारमध्ये असलेल्या ऑटो पायलट मोडमुळे चालकाला गाडी चालवण्याची गरज नसते. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमुळे टेस्ला कार चांगलीत चर्चेत आली आहे.
टेस्ला कारमध्ये असलेल्या ऑटो पायलट मोडमुळे कार चालकाशिवाय आपोआप पुढे चालत राहते. पण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओने कारमधल्या ऑटो पायलट मोडबद्दल लोकांमध्ये वेगळीच चर्चा रंगली आहे. अमेरिकेत राहणाऱ्या जॉर्डन नेल्सन नावाच्या व्यक्तीने याचा एक व्हिडिओ बनवला आहे.
त्याचं घडलं असं की जॉर्डन नेल्सन यांनी आपली कार ऑटो पायलट मोडवर टाकली. पण गाडी सारखी ब्रेक मारू लागली. जॉर्डन नेल्सन यांनी याचा शोध घेतला असता त्यांना यामागचं खरं कारण समजलं.
कार पुढे जात असताना समोर पिवळ्या रंगाचा चंद्र दिसत होता. चंद्राला सिग्नल समजून कार सारखा सारखा ब्रेक मारू मारती होती. या प्रकाराचा नेल्सन यांनी व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडियावर टाकला. जॉर्डन नेल्सन यांनी एलन मस्क यांनाही हा व्हिडिओ टॅग केला, आणि कॅप्शनमध्ये लिहिलं 'चंद्र तुमच्या कारच्या ऑटो पायलट मोडला कसा फसवत आहे, हे तुम्ही तुमच्या टीमला नक्की सांगाल'.
Hey @elonmusk you might want to have your team look into the moon tricking the autopilot system. The car thinks the moon is a yellow traffic light and wanted to keep slowing down. @Teslarati @teslaownersSV @TeslaJoy pic.twitter.com/6iPEsLAudD
— Jordan Nelson (@JordanTeslaTech) July 23, 2021
आपल्या ट्विटमध्ये जॉर्डन यांनी पुढे म्हटलंय, तुमच्या कारला चंद्र म्हणजे पिवळा ट्रॅफिक सिग्नल वाटतोय, आणि कार सारखी सारखी ब्रेक मारतेय. 23 सेकंदाच्या या व्हिडिओत कारने तब्बल 13 वेळा ब्रेक मारला. हा व्हिडिओ सोशल मिडियावर 9 लाखांपेक्षा जास्तवेळा पाहिला गेला आहे.
टेस्ला कार विकत घेतल्यावर सेल्फ ड्रायव्हिंग फिचरसाठी 199 डॉलर मोजावे लागतात.