मुंबई: धोकादायक घोषित करण्यात आलेला लोअर परळ पूल पाडण्याच्या कामाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. या पुलाचा काही भाग गंजल्यामुळे तो धोकादायक म्हणून घोषित करण्यात आला होता.
हा पूल तोडण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. पूल तोडण्यासाठी पश्चिम रेल्वेने मागवलेल्या निविदेतून कंत्राटदार नेमण्यात आला आहे. या कामासाठी सात कोटी 25 लाखांची निविदा मंजूर झाली आहे. हा पूल तोडल्यामुळे गणेशोत्सवादरम्यान नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे.
पश्चिम रेल्वे, आयआयटी, महापालिकेच्या संयुक्त पथकाने केलेल्या पाहणीत लोअर परळचा पूल धोकादायक म्हणून जाहीर केला. त्यांनतर हा संपूर्ण पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.
लोअर परळचा पूल पाडणे तांत्रिकदृष्ट्या अवघड असल्याने त्यास किमान तीन महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे. त्यासाठी स्वतंत्रपणे ब्लॉक घ्यावा लागणार आहे. हा पूल पाडण्याचा पहिला टप्पा म्हणून शनिवारपासून काम हाती घेण्यात आले आहे. त्यात पुलावरील टाइल्स, दगड काढण्यात आले.
तसेच, या पुलावरील संरक्षक जाळीदेखील काढून टाकण्यात येत आहे. त्यासाठी छोट्या जेसीबीची मदत घेण्यात येत आहे. त्याच्या मदतीने इथली छोटीमोठी पाडकामे केली जात आहेत. या प्राथमिक स्वरूपांच्या कामानंतर मुख्य कामे काही दिवसांतच हाती घेतली जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.