मनसेच्या इशा-याने रेल्वे प्रशासन लागलं कामाला

अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेनं सुरु केलेल्या आंदोलनाचे परिणाम आता दिसू लागले आहेत.

Updated: Nov 6, 2017, 01:50 PM IST
मनसेच्या इशा-याने रेल्वे प्रशासन लागलं कामाला  title=

मुंबई : अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेनं सुरु केलेल्या आंदोलनाचे परिणाम आता दिसू लागले आहेत.

खुद्द पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्राद्वारे प्रशासनाने सुरु केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे रेल्वे व्यवस्थापनाला चांगलीच जाग आल्याचे चित्र आहे. 

एल्फिस्टन रेल्वेपुलावर झालेल्या दुर्घटनेनंतर ५ ऑक्टोबरला राज ठाकरे यांनी रेल्वे प्रवाशांच्या समस्यांबाबत प्रशासनाला जाब विचारण्यासाठी चर्चगेट येथील पश्चिम रेल्वे प्रशासकीय कार्यालयावर संताप मोर्चा काढला होता. त्यावेळी रेल्वे प्रवाशी संघटनांच्या वतीने राज ठाकरे यांनी महाव्यवस्थापकांना मागण्यांचे निवेदन दिले होते. 

त्यात प्रामुख्याने रेल्वे हद्दीतील अनधिकृत फेरीवल्यायांवर कारवाईसाठी ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात १५ दिवसांचा अल्टीमेटम दिला होता. दिवाळी सण झाल्यानंतर या अल्टीमेटमनुसार अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेनं आक्रमक आंदोलन हाती घेतलंय. ज्याचे हिंसक पडसाद उमटत आहेत. तसंच फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर मनसे विरुद्ध मुंबई काँग्रेस असं राजकारणही सुरु झालंय.

पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक परीक्षित मोहनपुरीया यांनी पत्रामध्ये राज ठाकरे यांना वेगवेगळी माहिती दिलीये. या पत्रात त्यांनी रेल्वे हद्दीतील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाईची मोहीम सुरू केल्याचे सांगितले. तसेच रेल्वे स्टेशनच्या स्वच्छतेकडेही अधिक लक्ष दिलं जात असल्याचं सांगितलं. यासोबत नव्या फुट ओव्हर ब्रीजची बांधणीही सुरू झाल्याचे म्हटले आहे. 

 

१) महिलांसाठी राखीव डब्यांमध्ये सुरक्षा.

२) महिलांसाठी रेल्वे स्थानकांमध्ये स्वच्छतागृहांची संख्या वाढवणे आणि त्यांची दररोज सफाई

३) पश्चिम रेल्वेच्या गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न