Video: शरद पवारांनी स्वतः ममता बॅनर्जींचा हात पकडून खुर्ची ऑफर केली पण...

CM Mamata Banerjee : मुंबईतील ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीआधीच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममत बॅनर्जी या मुंबईत दाखल झाल्या होत्या. ममता बॅनर्जी यांनी यावेळी उद्धव ठाकरे, अमिताभ बच्चन यांची देखील भेट घेतली होती.

आकाश नेटके | Updated: Sep 1, 2023, 02:47 PM IST
Video: शरद पवारांनी स्वतः ममता बॅनर्जींचा हात पकडून खुर्ची ऑफर केली पण... title=

INDIA Alliance Mumbai Meeting : मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून इंडिया आघाडीची (INDIA) बैठक सुरु आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील दिग्गज नेते मुंबईत दाखल होत आहेत. या बैठकीला देशभरातील 28 राजकीय पक्षांचे 63 प्रतिनिधी हजर आहेत. यामध्ये 11 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासह पश्चिम बंगालच्या मुख्मंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) देखील या बैठकीला उपस्थित आहेत. मात्र या बैठकीतले अनेक किस्से आता समोर येत आहेत.

विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीचा आज दुसरा दिवस आहे. मुंबईमधील ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये सुरु असलेल्या या बैठकीमधील फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. यातल्या एका व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नेत्यांसह बसण्यासाठी खूर्चीच उपलब्ध नसल्याने त्यांची शोधाशोध सुरु असल्याचे पाहायला मिळालं आहे. 

बैठकीमधून समोर आलेल्या व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी खुर्चीच्या शोधात असताना शरद पवारांनी त्यांना आपली खुर्ची देवू केली होती. ममता बॅनर्जी यांचा हात पकडून पवारांनी त्यांना खुर्चीवर बसवण्यासाठी प्रयत्नही केला. परंतु ममता बॅनर्जी यांनी आपला हात सोडवत त्यांच्या खुर्चीवर बसण्यास नकार दिला आणि दुसरीकडे खुर्चीच्या शोधात निघून गेल्या. यानंतर शरद पवारही मिश्किलपणे हसले. त्यावेळी उद्धव ठाकरे, अखिलेश यादव हे देखील उपस्थित होते.

आजच्या बैठकीत तृणमूल नेत्या ममता बॅनर्जी यांनी 2 ऑक्टोबरला मोहनदास करमचंद गांधी यांच्या जयंतीनिमित्त 5 ते 6 मुद्द्यांवर इंडिया या मुख्य कार्यक्रमाची घोषणा दिल्लीतील राजघाटावर करावी, असा प्रस्ताव मांडला आहे. लवकरात लवकर कामाला सुरुवात करावी, असे त्यांचे मत आहे. विशेषत: भाजपच्या विरोधात तातडीने आंदोलन करण्याची गरज आहे, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या. तसेच वेळ वाया घालवू नका अशी सूचना देखील ममता बॅनर्जी यांनी केली आहे.

विरोधी आघाडीचा लढा हा भारताला सर्वोत्तम बनवण्यासाठी आहे. आम्ही देशाच्या हितासाठी लढत आहोत. देशाच्या भल्यासाठी जी काही पावले उचलली जावीत ती आम्ही उचलू, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या. तसेच गुरुवारी देशांतर्गत चर्चेत ममता बॅनर्जी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जागा वाटपावर लवकर निर्णय घेण्याची ऑफर दिली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी राज्य पातळीवर जागावाटपावर लवकर चर्चा करण्यास सांगितले आहे.