मुंबई : मरायला टेकलेल्या एका तरुणाकडे रेल्वे पोलिसांनी दुर्लक्ष केल्यानं या तरुणाला आपला जीव गमावल्याचं समोर आलंय. महत्त्वाचं म्हणजे, ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय.
सीसीटीव्हीतील कॅमेऱ्यात झालेल्या दृश्यात, पनवेलला जाणाऱ्या एका रेल्वेमधून फलाटावर उतरताना तोल जाऊन तरुण कोसळताना स्पष्टपणे दिसतोय. ही घटना २३ जुलै रोजी सानपाडा रेल्वे स्टेशनवर घडली.
हा अपघातग्रस्त तरुण फलाटावर बऱ्याच काळ तशाच अवस्थेत पडलेला होता. थोड्या वेळानं जीआरपी कॉन्स्टेबल आणि होमगार्ड तिथं दाखल झाले. त्यांनी या तरुणाला पाहिलंही... परंतु, त्याला रुग्णालयात हलवण्याऐवजी त्यांनी या तरुणाला समोरून येणाऱ्या दुसऱ्या ट्रेनच्या एका डब्यात ढकलून दिलं...
तब्बल १० तासानंतर पनवेलमधे यार्डमध्ये हा तरुण एका सफाई कर्मचाऱ्याला ट्रेनमध्ये आढळला. त्यानंतर त्याला पनवेल ग्रामीण हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं. इथं डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
मृत तरुणाची अद्याप ओळख पटू शकलेली नाही. सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आलंय.