वाडिया परिवाराला रुग्णालयाच्या जागेवर खासगी बांधकाम करायचेय; आशिष शेलारांचा आरोप

आम्ही वाडिया रुग्णालय बंद पडू देणार नाही.

Updated: Jan 13, 2020, 05:45 PM IST
वाडिया परिवाराला रुग्णालयाच्या जागेवर खासगी बांधकाम करायचेय; आशिष शेलारांचा आरोप title=

मुंबई: मुंबईतील वाडिया रुग्णालयाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजप आमनेसामने आले आहेत. मुंबई महानगरपालिका आणि वाडिया समूहात केवळ नुरा कुस्ती सुरु आहे. हे रुग्णालय बंद करून त्या जागेचा पुनर्विकास करायचा वाडिया परिवाराचा इरादा आहे. या सगळ्यात महापालिकेचे त्यांना सहकार्य आहे. त्यामुळे दोघांनीही 'तेरी भी चूप मेरी भी चूप' भूमिका घेतल्याचा आरोप शेलार यांनी केले. मात्र, आम्ही वाडिया रुग्णालय बंद पडू देणार नाही. याविरोधात आंदोलन उभारू, असा इशाराही यावेळी शेलारांनी दिला.

वाडिया रुग्णालय बंद होण्याच्या मार्गावर, महापौरांकडून आश्वासन

यावेळी शेलार यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या अंमलबजावणीला महाविकासआघाडी सरकारकडून करण्यात येत असलेल्या विरोधासंदर्भातही भाष्य केले. CAA चा विरोध करणाऱ्यांना परवानगी मिळते. परंतु, समर्थन करणाऱ्यांना परवानगी मिळत नाही. CAA समर्थनार्थ शाळेत कार्यक्रम आयोजित केला तर नोटीस बजावली जाईल, हा कुठला अजब न्याय झाला, असा सवालही आशिष शेलार यांनी उपस्थित केला. 

गेल्या काही दिवसांपासून वाडिया चिल्ड्रन्स हॉस्पिटल आणि मॅटर्निटी हॉस्पिटल यांचे २२९ कोटी रुपयांचे अनुदान राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने थकवल्यामुळे त्याचा रुग्णसेवेवर परिणाम झाला आहे. अत्यावशक उपचार गरजेचा असलेल्या रुग्णांना केवळ भरती केले जात असून इतर नवीन रूग्ण भरती करून घेतले जात नाहीत. 

औषधे, ड्रग्ज, ऑक्सिजनसह इतर वस्तूंचा पूरवठा करणाऱ्या कंत्राटदारांची देणी देण्यासही निधी नसल्याने रूग्णालय प्रशासनाने दोन्ही रुग्णालय बंद करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. तर रुग्णालयातील १ हजार कर्मचाऱ्यांचा डिसेंबर महिन्याचा पगार थकला आहे.