मुंबई : विधानसभा अध्यक्ष निवडणूकीवरुन राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी नियम बदलाची प्रक्रिया घटनाबाह्य असल्याचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी म्हटलं आहे. राज्यपालांनी राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रात तसा उल्लेख करण्यात आला आहे.
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक खुल्या पद्धतीने घेण्यासाठी नियम बदलण्यात आला होता. हा नियम बदलण्यासाठी करण्यात आलेली प्रक्रिया घटनाबाह्य असल्याचे राज्यपालांनी राज्य सरकारला कळवलं आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
राज्यपालांना पुन्हा पत्र पाठवणार
दरम्यान, महाविकास आघाडी सरकार पुन्हा राज्यपालांना पत्र पाठवणार आहे. राज्यपालांनी लवकर निर्णय घ्यावा अशी विनंती करणारं पत्र पाठवलं जाणार आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या नियमात जे बदल करण्यात आले आहेत त्याचा कायदेशीर अभ्यास करत असल्याचे राज्यपालांनी राज्य सरकारला कळवले आहे. राज्यपालांनी हा कायदेशीर सल्ला लवकर घेऊन राज्य सरकारने केलेली विनंती मान्य करावी अशी विनंती करणारं पत्र पुन्हा पाठवले जाणार आहे
आघाडीच्या नेत्यांनी घेतली होती राज्यपालांची भेट
विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी काल राज्यपालांची भेट घेऊन निवडणूकीला मंजूरी देण्याची विनंती केली होती. त्यावर राज्यापालांनी आपला अभिप्राय कळवला असून निवडणूक प्रक्रियेवर हकरत घेतली आहे.
आवाजी मतदानाने निवडणूक
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने होत आली आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारने अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी पद्धतीने घेण्यासाठी नियमात बदल केला.