मुंबईत फक्त 323 स्क्वेअर फूटमध्ये 2 BHK फ्लॅट; किंमत ऐकून नेटकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालं

Viral Video: व्हायरल व्हिडीओत (Viral Video) रिअल इस्टेट (Real Estate) इन्फ्लुएन्सर मुंबईतील घर दाखवत आहे. फक्त 323 स्वेअर फूटमध्ये हा 2 बीएचके फ्लॅट बांधण्यात आला आहे. दरम्यान त्याची किंमत ऐकून नेटकऱ्यांमध्ये एकच चर्चा रंगली आहे.   

शिवराज यादव | Updated: Feb 1, 2024, 06:36 PM IST
मुंबईत फक्त 323 स्क्वेअर फूटमध्ये 2 BHK फ्लॅट; किंमत ऐकून नेटकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालं title=

Viral Video: मुंबईत (Mumbai) आपल्या हक्काचं घर असावं असं प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबाचं स्वप्न वाटतं. अनेकांचं आयुष्य तर हे स्वप्न पूर्ण करण्यातच जातं. याचं कारण मुंबईत घर घ्यायचं म्हटलं तर त्याच्या किंमती मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर असतात. छोट्याश्या घरासाठीही मुंबईत लाखो तर कधी कोटींपर्यंत पैसे मोजावे लागतात. याउलट त्याच पैशात मुंबईबाहेर ठाणे, विरार या बाजूला प्रशस्त घऱं मिळतात. याच कारणामुळे मध्यमवर्गीय कुटुंब घर घ्यायचं असेल तर थेट मुंबईबाहेरच जातात. दरम्यान त्याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत घर विकत घेणच नाही तर भाड्याने घेणंही खिशाला परवडणारं नाही. देशातील महागड्या शहरांमध्ये मुंबईची गणना होते. आधीच इमारतींची गर्दी झालेल्या मुंबईत आता नव्याने उभारल्या जाणाऱ्या इमारतींमधील घऱंही फार मोठी नाहीत. पण त्याच्या किंमती मात्र लाखांत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओत फक्त 323 स्वेअर फूटमध्ये हा 2 बीएचके फ्लॅट तयार करण्यात आल्याचं दिसत आहे. कांदिवली परिसरात ही इमारत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत. 

व्हिडीओ रिअल इस्टेट इन्फ्लुएन्सर या घराची टूर करताना दिसत आहे. तिने व्हिडीओत माहिती दिली आहे त्यानुसार, या 323 स्वेअर फूटांच्या या हा 2 बीएचके फ्लॅटची किंमत तब्बल 75 लाख आहे. व्हिडीओत ती सांगत आहे की, "जर तुम्ही 2BHK शोधत असाल परंतु तुमचे बजेट 1BHK खरेदी करण्यापुरतच आहे, तर तुम्ही हे घर खरेदी करु शकता. 23 मजली इमारतीत हा फ्लॅट आहे. हा कॉम्पॅक्ट 2BHK आहे, पण चांगल्या पद्धतीने तयार केला आहे".

व्हिडीओत तरुणी दोन छोटे बेडरुमही दाखवत आहे. त्यांना मायक्रो बाथरुम जोडण्यात आले आहेत. तसंच कमी जागेत लिव्हिंग रुम, किचनही तयार करण्यात आलं आहे. मास्टर बेडरुममध्ये तर फक्त सोफा ठेवण्याइतकी जागा आहे. बाथरुममध्ये तर आंघोळीला नीट उभं राहता येईल का याची शंका आहे. त्यात 23 मजली इमारतीत घर असल्याने मेंटेनन्स किती असेल याचाही अंदाज लावू शकतो. 

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत. हे फक्त मुंबईतच शक्य असल्याचं एका युजरने लिहिलं आहे. अनेकांनी इतक्या छोट्या जागेत फ्लॅट बांधल्याने खिल्ली उडवली आहे. काहींनी तर आमची बाल्कनी आणि ड्रॉइंग रुम संपूर्ण घरापेक्षा मोठे आहेत अशी खिल्ली उडवली आहे. 

तर काहींनी मुंबईतील रिअल इस्टेट मार्केट फार गांभीर्याचा विषय असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये यापेक्षा वाईट स्थिती असल्याचं सांगितलं आहे. 

एका युजरने ही पैशांची बर्बादी असून हैदराबादमध्ये 1000 स्क्वेअर फूटांचं प्रशस्त घर मिळेल असं म्हटलं आहे. ''मुंबईत राहणाऱ्या लोकांसाठ मला फार वाईट वाटत आहे,'' असं एक युजर म्हणाला आहे. 

 ''20 फूट x 16 फूट = 320 स्क्वेअर फूट. पुण्यातील फ्लॅटची बाल्कनी एवढी असते'', अस एकजण म्हणाला. तर एका युजरने म्हटलं की, ''323 चौरस फूट परिसरात 2BHK फ्लॅट. 323 चौरस फूट हे बॅडमिंटन कोर्टच्या अर्ध्या भागापेक्षाही कमी आहे. याची किंमत  75 लाख आहे. वॉशरूम चुकवू नका आणि त्यात आंघोळीसाठी जागा शोधण्याचा प्रयत्न करा''.

एका युजरने लिहिलं आहे की, मी तर वॉशरुममध्ये नेमकी आंघोळ कुठे करायची हे पाहण्यासाठी 3-4 वेळा व्हिडीओ पाहिला.