दीपक भातुसे, मुंबई : राज्यात अनेक भागात गेल्या 2 दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. रस्त्यांवर पाणी साचले. रेल्वे सेवा बंद झाली होती. रुग्णालंयामध्ये पाणी शिरलं. अनेक भागात रस्ते जलमय झाले होते. याबाबत बोलत असताना राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी म्हटलं की, हवामान खात्याचा अंदाज चुकला म्हणून आमचेही अंदाज चुकले.'
वड्डेटीवार यांनी म्हटलं की, हवामान खात्याने अतिवृष्टी होईल असा इशारा दिला होता. १५० ते १७५ मिमी पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज होता. ३३० मिमीपर्यंत पाऊस पडेल हा अंदाज कुणाचाच नव्हता. हवामान खात्याचा अंदाज चुकला म्हणून आमचेही अंदाज चुकले. असं वड्डेटीवार यांनी म्हटलं आहे.
'काल केवळ पाऊस नव्हता तर वाराही होता. हवामानाचे अचूक अंदाज येण्यासाठी राज्य सरकार पुढील सहा महिन्यात डिजास्टर कमांड कंट्रोल सेंटर उभं करतो आहे. देशात अद्ययावत असं हे केंद्र असेल. ४०० कोटी रुपये खर्च करून नागपूरला हे केंद्र उभारलं जाणार आहे. विरोधी पक्षनेत्याचा अधिकार आहे आरोप करण्याचा. पण वस्तुस्थिती वेगळी होती. ३३० मिमी पाऊस पडूनही मुंबई ८ तासात पूर्वपदावर आली.' असं देखील वड्डेटीवार यांनी म्हटलं आहे.
पुढे ते म्हणाले की, 'नालेसफाई झाली नसती तर एवढा पाऊस पडून मुंबई बराच काळ तुंबली असती, अनेकांचा जीव धोक्यात आला असता. विरोधी पक्षनेते म्हणतात नालेसफाई झाली नाही त्यात काही तथ्य नाही.'
'रायगडमध्येही जोरदार पाऊस होता, तटरक्षक दलाला आम्ही सतर्क ठेवलं होतं. लोकांच्या स्थलांतराची व्यवस्था केली होती. कोल्हापूर, सांगली सातारा या भागातही एनडीआरएफच्या टीम तैनात केल्या असून इतर काळजी घेतली आहे.' असं ही विजय वड्डेटीवार यांनी म्हटलं आहे.