VIDEO : मुख्यमंत्र्यांची राज ठाकरेंना मिश्किल विनंती

मंगळवारी झी समुहाच्या 'झी मराठी दिशा' या साप्ताहिकाचा प्रकाशन सोहळा मुंबईत पार पडला. या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना केलेल्या एका विनंतीनं उपस्थितांना पोट धरून हसायला भाग पाडलं.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 5, 2017, 09:06 PM IST
VIDEO : मुख्यमंत्र्यांची राज ठाकरेंना मिश्किल विनंती title=

मुंबई : मंगळवारी झी समुहाच्या 'झी मराठी दिशा' या साप्ताहिकाचा प्रकाशन सोहळा मुंबईत पार पडला. या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना केलेल्या एका विनंतीनं उपस्थितांना पोट धरून हसायला भाग पाडलं.

आपण सध्या फेसबुकवर आपलं व्यंगचित्र प्रकाशित करतो... परंतु, 'झी मराठी दिशा' या साप्ताहिकासाठी आपण नक्की व्यंगचित्र काढणार, असा शब्द यावेळी राज ठाकरेंनी दिला... त्यावेळी, खुद्द मुख्यमंत्र्यांकडून आपल्याला अशी विनंती येईल, अशी कल्पनाही त्यांनी केली नसेल... 

मुख्यमंत्र्यांनी साधलं टायमिंग

त्यानंतर भाषणासाठी उभ्या राहिलेल्या मुख्यमंत्र्यांनी ही संधी साधली आणि राज ठाकरेंना एक मिश्किल विनंती त्यांनी यानिमित्तानं करूनच टाकली.

'राज ठाकरे माझे मित्र आहेत त्यामुळे तुमच्याकडे माझी एक विनंती आहे... मी लठ्ठ आहे हे मला माहीत आहे पण माझं व्यंगचित्र काढताना माझं पोट इतकं तिप्पट मोठं दाखवतात... माझी विनंती आहे नाक मोठं दाखवा, कान लांब दाखवा, टक्कल दाखवा पण पोट थोडंसं लहान दाखवा...' अशी मिश्किल विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली... आणि उपस्थितांत एकच हशा पिकला.

'झी मराठी दिशा'चं प्रकाशन

'झी समूहा'च्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या या नव्या आठवडापत्राचं प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सायंकाळी समारंभपूर्वक झालं. एस्सेल समूहाचे शिल्पकार आणि मार्गदर्शक, राज्यसभा खासदार सुभाष चंद्रा, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर आदी मान्यवर या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित होते.