मुंबई : युनियन बँकेच्या ७० खातेदारांचा डेटा चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. चोरट्यांनी डेटा चोरून १५ ते २० लाख रूपये लांबवल्याचं उघड झालं आहे. तक्रारदारांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सांताक्रूझच्या जुहू तारा रोड शाखेत हा प्रकार प्रथम उघड झाला आहे. ८ आणि ९ डिसेंबरला खात्यातून परस्पर पैसे काढल्याच्या तक्रारी आल्या नंतर हा प्रकार समोर आला. सर्व्हर हॅक करून पैसे चोरल्याचा अंदाज आहे. चोरण्यात आलेल्या डेटावरून बनावट एटीएम कार्ड तयार करून वेगवेगळ्या ठिकाणांहून पैसे काढण्यात आले आहेत.
एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही फुटेज मिळविण्यात येत असून त्याआधारे शोध सुरु असलयाचे सांताक्रूझ पोलिसांनी सांगितले. एकाच बँकेतील आणि एकाच शाखेतील सुमारे ७० खात्यांमधून पैसे काढण्यात आल्याने खातेदारांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. खातेदारांनी घाबरू नये, असे आवाहन बँकेच्या वतीने करण्यात आले आहे. ज्यांच्या खात्यातून पैसे गेले, अशा ग्राहकांना बँकेने डिस्प्युट फॉर्म दिले आहेत.
पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. मात्र खात्यातून पैसे गेल्यामुळे ग्राहक चिंतेत आहेत.