मुंबई : दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी करीमलालाला भेटल्याचं वक्तव्य अखेर शिवसेना खासदार संजय राऊतांनी मागे घेतलंय. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर वक्तव्य मागे घेत असल्याचं संजय राऊत यांनी सांगितंलय. एकेकाळच्या अडरवर्ल्ड डॉन करीम लाला हा पठाणांच्या संघटनेचा अध्यक्ष होता. त्या निमित्तानं तो इंदिरा गांधींना पंतप्रधान या नात्यानं भेटत असे असं संजय राऊतांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. पण, तरीही काँग्रेसचा दबाव वाढल्यामुळे राऊतांना अखेर वक्तव्य मागे घ्यावं लागलं.
ज्या करीम लालावरुन सगळं महाभारत सुरू झालं, तो करीमलाला नक्की होता तरी कोण याविषयीच सर्वत्र चर्चा सुरु आहे. हाच तो करीमलाला, ज्याचा उल्लेख राऊतांनी केला आणि रान पेटलं. करीमलालाचं खरं नाव अब्दुल करीम शेर खान. अफगाणिस्तानातला हा पठाण पश्तून समुदायाचा शेवटचा राजा समजला जायचा. व्यापार करता करता करीमलाला भारतात आला.
करीमलाला मुंबई अंडरवर्ल्डचा पहिला डॉन झाला. तो हिंदुस्थानात आला तेव्हा फक्त २१ वर्षांचा होता. हाजी मस्तान आणि करीमलालाची पक्की दोस्ती होती. तस्करी आणि मुंबईतले तमाम बेकायदेशीर धंदे या करीम लालाने सुरू केले. हिरे आणि दागिन्यांच्या तस्करीमधून तो अंडरवर्ल्डमध्ये शिरला. मुंबईत ठिकठिकाणी त्याचे दारू आणि जुगाराचे अड्डे होते. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तो रोज घरी जनता दरबार घ्यायचा. करीम लालाचे राजकारणी आणि चित्रपट जगताशीही जवळचे संबंध होते. एका फसवणूकीप्रकरणी अभिनेत्री हेलनही करीमलालाकडे दाद मागायला गेली होती, असं सांगितलं जातं.
तस्करीच्या धंद्यात दाऊद उतरला आणि सुरू झाली करीम लाला आणि दाऊदची दुश्मनी. एकदा दाऊद करीमलालाच्या अंगावर धावून गेला. त्यानंतर करीम लालानं दाऊदला बेदम मारहाण केली. त्यात दाऊद गंभीर जखमी झला होता. अंडरवर्ल्डमध्ये हा किस्सा एकदम फेमस आहे. दाऊद आणि करीमलालाची दुश्मनी वाढत गेली आणि अंडरवर्ल्डमध्ये सुरू झाला मर्डर मामला. अंडरवर्ल्डमधील 'गोली मार भेजे में'चा प्रकार इथूनच पुढे सुरू झाला. १९८१ मध्ये करीमलालाच्या पठाण गँगनं दाऊद इब्राहिमचा भाऊ शब्बीरची दिवसाढवळ्या हत्या केली. त्यानंतर दाऊदचं डोकं फिरलं आणि मुंबईच्या रस्त्यांवर गँगवॉरला सुरुवात झाली १९८६ मध्ये डी गँगनं करीमलालाचा भाऊ रहीम खानला मारलं आणि बदला घेतला. त्यानंतर डी गँगचा मुंबई अंडरवर्ल्डमध्ये दबदबा सुरू झाला आणि हळूहळू करीमलालाच्या गँगचा दी एंड झाला. २००२ मध्ये करीमलालाचा मुंबईतच मृत्यू झाला.