उद्धव ठाकरे एकदा नव्हे, तर दोनदा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार होते, पण...

शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. 

Updated: Jun 27, 2022, 06:50 PM IST
उद्धव ठाकरे एकदा नव्हे, तर दोनदा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार होते, पण... title=

Eknath Shinde Rebel: शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. यामुळे सरकार अडचणीत आल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन वेळा राजीनामा देण्याची तयारी केली होती, अशी माहिती सू्त्रांनी दिली आहे. 21 आणि 22 तारखेला मुख्यमंत्री आपल्या पदाचा राजीनाम देणार होते, असं सूत्रांनी सांगितलं आहे. अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या दिवशी एकनाथ शिंदे त्यांच्या समर्थकांसह सुरतला गेले होते. त्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ नेत्याने त्यांना राजीनामा देण्यापासून रोखल्याची माहिती समोर आली आहे. या राजकीय घडामोडीनंतर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी सकाळी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. त्यांनी दुपारी चार वाजता मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचे ठरवले होते. त्यामुळेच अखेरचे आभार मानता यावेत म्हणून त्यांनी सचिवांची बैठकही बोलावली होती. पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तसं करण्यापासून रोखण्यात महाविकास आघाडीच्या नेत्याला यश आलं. एकनाथ शिंदेच्या आक्रमक भूमिकेमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार संकटात आलं आहे. तर सत्तेत असलेल्या शिवसेनेत उभी फूट पडली आहे. त्यात नेमकी शिवसेना कुणाची यावरून आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. एकनाथ शिंदे गट कोणत्याही पक्षात विलीन होणार अशी माहिती समोर येत आहे.

11 जुलैपर्यंत सरकारविरोधात अविश्वास ठराव आलाच तर त्याविरोधात कोर्टात धाव घेण्याची मुभा द्यावी अशी मविआच्या वकिलांची मागणी सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावलीय. त्यामुळे एकनाथ शिंदे  गटाला सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडण्याचा मार्ग मोकळा झालाय. 

शिंदे गटात त्यादृष्टीनं हालचाली सुरू झाल्या आहेत. गुवाहाटीतून एकनाथ शिंदे आज मुंबईत येण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची ते भेट घेणार असल्याचं बोललं जात आहे. एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांची भेट घेण्यासाठी वेळ मागितल्याचीही माहिती आहे. राज्यापालांच्या भेटीत आपल्याबरोबर किती आमदार आहेत, कशाप्रकारे सत्ता स्थापन करता येईल, याबाबत सविस्तर माहिती ते राज्यपालांना देतील. 

एकनाथ शिंदे गटाकडून मविआ सरकारविरोधात दोन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. आता सुप्रिम कोर्टाच्या निकालानंतर एकनाथ शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला असून शिंदे गटाकडून सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे.  त्यामुळे पुढील काही दिवसात सरकारला बहुमत सिद्ध कऱण्याच्या प्रक्रियेला सामोरं जावं लागू शकतं.