मुंबई : आमदारांना निधीवाटपच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी निघालेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हात हलवत परत आलेत. मुख्यमंत्री विधीमंडळ अधिवेशनात व्यस्त असल्यामुळे ही भेटच रद्द झालीये. मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे शिवालय या शिवसेनेच्या कार्यालयाजवेळ पोहोचले होते. मात्र, ही भेट होऊ शकलेली नसल्याने पुन्हा एकदा शिवसेना-भाजपात जुंपण्याची शक्यता आहे.
शिवसेनेच्या आमदारांना पुरेसा निधी मिळत नसल्याची तक्रार आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांशी या मुद्यावर भेट घेऊन चर्चा करणार होते. मात्र या बैठकीला ते आपल्या पक्षाच्या आमदारांनाही सोबत घेतले होते. यापूर्वीही शिवसेना आमदारांनी पुरेसा निधी मिळत नसल्याची तक्रार केलीय. त्यानुसार उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठक नियोजित करण्यात आली होती. शिवसेना आमदारांच्या निधीसंदर्भात काही विषय मांडण्यासाठी 'शिवालय' या शिवसेनेच्या कार्यालयात ही भेट होणार होती. मात्र सभागृहाच्या कामकाजात व्यस्त असल्यामुळे फडणवीस ठरल्या वेळी येऊ शकले नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरे भेट न तडक निघून गेले.
दरम्यान, उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यामध्ये फोनवरुन संभाषण झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेय. फोनवर चर्चा झाल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी वेळही ठरवून दिली आहे. त्यामुळे यानंतर शिवसेना काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी युतीसाठी शिवसेनेकडे प्रस्ताव ठेवला होता. मात्र, हा प्रस्ताव शिवसेनेने फेटाळला होता. याबाबत शिवसेना नेते रामदास कदम यांनी आम्ही आधीच जाहीर केलेय. त्यामुळे युती होण्याचा प्रश्नच येत नाही, असे सांगत टोला लगावला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना ताटकळत ठेवल्याने नवी चर्चा सुरु झालेय. नियोजित भेट का होऊ शकलेले नाही, याचीच जास्त चर्चा आता रंगू लागली आहे.