मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्रीमंडळातील चार मंत्र्यांवर झालेले आरोप फेटाळून लावत त्यांना क्लीनचीट दिली आहे. पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी तोरणमाळ हिल रिसॉर्ट कंपनीमार्फत पर्यटन विभागाचे रिसॉर्ट लाटल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी फेटाळला असून तोरणमाळ हिल रिसॉर्ट कंपनीशी जयकुमार रावल यांचा संबंध नसल्याचा खुलासा केला आहे. ॉ
संभाजी पाटील-निलंगेकर यांना बँकांकडून ५२ कोटी रुपयांची माफी मिळाल्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला आहे. निलंगेकर यांनी हे कर्ज घेतलं नसून ते केवळ जामीनदार असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी त्यांनाही क्लीनचीट दिली आहे. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या सोलापूर येथील बंगल्याबाबत सुरू असलेल्या वादाबाबतही स्पष्टीकरण देत मुख्यमंत्र्यांनी देशमुख यांनाही क्लीनचीट दिली आहे.
देशमुख यांनी आऱक्षित जमीनीवर बंगला बांधल्याचा आऱोप होता, मात्र हे प्रकरण २००४ सालीच नियमानुकूल झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. एमआयडीसी जमीन घोटाळ्याप्रकणात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या चौकशीचा अहवाल सभागृहात मांडताना मुख्यमंत्र्यांनी त्यांनाही अहवालाच्या आधारे क्लीनचीट दिली आहे.
दुसरीकडे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांची लोकायुक्तांमार्फत चौकशी सुरू असून त्याबाबत तथ्य योग्य वेळी समोर येईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान, एकनाथ खडसे यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांचा राजीनामा घेण्यात आला आणि नंतर चौकशी लावण्यात आली. मात्र तोच न्याय इतर मंत्र्यांबाबत का लावला नाही असा सवाल विरोधक उपस्थित करत आहेत.