दिनेश दुखंडे, झी मीडिया, पंढरपूर : राम मंदिरासाठी उद्धव ठाकरेंनी पंढरीच्या विठुरायाला साकडं घातलंय. २०१९ चे वारे पाहता कुठल्या मुद्द्याचं नाणं खणखणीत वाजेल, याचा अंदाज उद्धव ठाकरेंना आलेला आहे. २०१४ ते २०१९ हा उद्धव ठाकरेंसाठी कसा होता प्रवास? उद्दव ठाकरेंची राजकीय रणनीती यशस्वी झाली का? यावर हा स्पेशल रिपोर्ट...
सोमवारी, 'अवघे भगवे पंढरपूर चालला रामाचा गजर...' असंच वातावरण पंढरीत होतं. अयोध्येतल्या राम मंदिरासाठी साकडं घालायला उद्धव ठाकरे पंढरीत विठूरायाच्या चरणी लीन झाले. नोव्हेंबरमध्ये अयोध्येत शरयूची आरती, डिसेंबरमध्ये पंढरपुरात चंद्रभागेची आरती आणि पुढच्या महिन्यात मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत गंगेची आरती... आणि हे सगळं सुरू आहे ते अयोध्येतल्या राम मंदिरासाठी... २०१९ च्या निवडणुकांत हिंदुत्वाचा नारा गाजेल, असा उद्धव ठाकरेंचा अंदाज आहे. त्याची सुरुवात त्यांनी दसऱ्या मेळाव्यात 'सरकार राममंदिर बांधणार नसेल तर आम्ही बांधू' असं म्हणत केली.
मंदिर वही बनाएंगेची आठवण करुन देण्यासाठी उद्धव ठाकरे अयोध्येत पोहोचलेसुद्धा.... राम मंदिरासाठी संकल्प पूजा करत उद्धव ठाकरेंनी चांदीची प्रतिकात्मक वीट संत-महंतांच्या हाती सोपवली... 'हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार'चा नाराही त्यांनी यावेळी दिला.
अयोध्या दौऱ्याचं पुढचं पाऊल म्हणजे उद्धव ठाकरेंची पंढरीची वारी... उद्धव ठाकरेंच्या राम मंदिरासाठीच्या या वारीमुळे उद्धव ठाकरेंना एकदम राष्ट्रीय राजकारणात वरच्या स्थानावर नेऊन ठेवलंय. २० वर्षांपूर्वी मुंबई महापालिका निवडणुकीच्या व्यूहरचनेपासून सुरु झालेला त्यांचा राजकीय प्रवास आता राष्ट्रीय राजकारणाच्या व्यूहरचनेपर्यंत येऊन पोचलाय... बाळासाहेबांसारखी आक्रमक शैली नाही, अशी टीका उद्धव ठाकरेंनी अनेक वर्षं सोसली... मुळातच शांत, संयमी आणि दूरदृष्टी असणारा उद्धव ठाकरे यांचा स्वभाव... त्यामुळे उद्धव यांनी बाळासाहेबांची नक्कल करण्यापेक्षा पक्षात स्वतःची शैली निर्माण करण्याचा प्रयत्न केला...
जाहिरात क्षेत्रातून स्वतःच्या करियरची सुरुवात करण्याऱ्या उद्धव ठाकरेंना एखादी संकल्पना यशस्वी करण्यामागे नियोजन आणि व्यवस्थापन किती महत्त्वाचं असतं हे पक्कं ठाऊक होतं... ती नीती त्यांनी रस्त्यावरचा राडा करणाऱ्या रांगड्या शिवसेनेत राबवली... पक्षाचा प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा जोपासताना त्यांनी 'मी मुंबईकर' या संकल्पनेचा प्रयोग करून मोठी मतपेढी असलेल्या उत्तर भारतीयांनाही चुचकारण्याचा प्रयत्न केला... उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यामागे महाराष्ट्रातल्या विशेषतः मुंबईतल्या उत्तर भारतीयांची मतं मिळवण्याचीही रणनीती होती...
उद्धव ठाकरेंनी पक्षात स्वतःची विश्वासू टीम बांधायला सुरुवात केली. त्यांची धोरणं, कामाची पद्धत, भूमिका न पटल्याने पक्षात त्यांचा विरोधी गटही तयार झाला. ज्याचं रूपांतर शिवसेना फुटण्यात झालं. नारायण राणे-राज ठाकरे यांच्याप्रमाणे अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरेंद्वेषापायी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' केलं. २००५ ते २०१२ हा काळ उद्धव ठाकरेंची कसोटी पाहणारा ठरला. या काळात ते अनेकदा मोठ्या अपयशाला सामोरं गेले. या काळात खऱ्या अर्थाने त्यांचं नेतृत्व तावून-सुलाखून निघालं. स्वकीयांनीच आव्हान उभं केलं असताना मुंबई महापालिकेतली सत्ता कायम राखण्यात उद्धव यांना यश आलं... पण राज्य आणि केंद्रीय राजकारणात पक्षाची घडी विस्कटली. पक्षाला मोठा फटका बसला... एकाबाजूला पक्षाच्या खासदार-आमदारांचं संख्याबळ घटत चाललं असताना, राज्यातलं विरोधी पक्षनेते पदही गमावण्यापर्यंत परिस्थिती गेली. या संकटाच्या काळातही उद्धव यांनी संयम राखला.
बाळासाहेबांच्या पश्चात पक्षप्रमुख म्हणून शिवसेनेची सर्व सूत्रं हातात आल्यानंतर त्यांनी पक्षाच्या पुढच्या वाटचालीची नियोजनबद्घ आखणी केली. हा नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रीय राजकारणातल्या उदयाचा काळ होता. मोदींच्या लोकप्रियेतच्या लाटेवर स्वार होत शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले. शिवसेनेच्या राजकीय वाटचालीतलं हे सर्वात मोठं यश होतं... पण या यशाचं श्रेय हे मोदीप्रणित भाजप घेत असल्याचे लक्षात आल्यावर उद्धव ठाकरे सावध झाले. राज्यात भाजपशी असलेल्या उघड स्पर्धेत शिवसेनेचं अस्तिव टिकवून ठेवण्याचं मोठं आव्हान त्यांच्यापुढे होतं. मोदींच्या लोकप्रियतेच्या लाटेत विरोधी पक्षांचा टिकाव लागत नसताना उद्धव ठाकरेंनी स्वबळावर शिवसेनेचे ६३ आमदार निवडून आणले. राज्यात प्रमुख विरोधी पक्ष असतानाही महिनाभरात भाजप सत्तेत सहभागी होण्याचा त्यांचा निर्णय दूरदृष्टी ठेऊन होता. भाजपनं आमदारांना दाखवलेल्या प्रलोभनांपुढे त्यांनी पक्ष फुटण्यापासून वाचवला. सत्तेची फळं चाखताना सरकारच्या धेयधोरणांवर प्रसंगी टीका करीत विरोधी पक्षाचीही भूमिका बजावली. भाजपप्रणित सत्तेत उद्धव यांचं मन कधीच रमले नाही... त्यामुळे 'पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच' हा संकल्प सोडताना त्यांनी यापुढे स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केलीय. सत्तेच्या राजकारणात जास्तीत जास्त पदरात पाडून घेण्यासाठी भाजपवर त्यांचं हे दबावाचं राजकारण मानलं जातंय.
आता राम मंदिर निर्माणाचा मुद्दा हातात घेत उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय राजकारणात झेप घेतलीय. शक्तिप्रदर्शन आणि इव्हेंट म्हणून उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा यशस्वी ठरला... तीच कथा त्यांच्या पंढरीच्या वारीची... या दौऱ्यातून त्यांनी एका दगडात अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न केलाय. सत्ताधीश भाजपवर दबाब, स्वतःची राष्ट्रीय नेता प्रतिमा तयार करणं आणि उत्तर भारतीय मतपेढीला आकर्षित करणं हे तीन हेतू उद्धव ठाकरेंनी राम मंदिराचा मुद्दा हाती घेत साध्य केलेत.
'जर बाबरी पाडणारे शिवसैनिक असतील तर त्यांचा मला अभिमान आहे' ही भूमिका बाळासाहेब ठाकरेंनी मांडली होती... आता त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे हे वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत राम मंदिर निर्माणासाठी दबाव निर्माण करताना दिसत आहेत. मंदिर बांधण्यासाठी शिवसेना पुढाकार घेत नाहीय, पण आम्ही मंदिर बांधणाऱ्यांना आठवण करुन देतोय, असं म्हणत शिवसेना देशभर रान उठवतेय.
२०१९ ची हवा पाहता मंदिर निर्माणाबाबत असलेल्या रेट्यामुळे मोदी सरकारला आगामी काळात अध्यादेश काढावा लागला तर श्रेयाच्या नामावलीत उद्धव ठाकरेंचा क्रमांक नक्कीच असेल... आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकीय वाटचलीतला तो महत्त्वाचा टप्पा मानला जाईल...