टीआरपी घोटाळा प्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या अडचणीत वाढ, दोघांना समन्स

टीआरपी घोटाळा (TRP scam ) प्रकरणी रिपब्लिक (Republic) टीव्हीच्या अडचणीत वाढणार आहेत.  

Updated: Oct 14, 2020, 07:59 AM IST
टीआरपी घोटाळा प्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या अडचणीत वाढ, दोघांना समन्स title=

 मुंबई : टीआरपी घोटाळा (TRP scam ) प्रकरणी रिपब्लिक (Republic) टीव्हीच्या अडचणीत वाढणार आहेत. क्राईम इंटेलिजेन्स युनिटकडून रिपब्लिक टीव्हीच्या एक्झिक्युटिव्ह एडिटर निरंजन नारायनस्वामी आणि पत्रकार अभिषेक कपूरला समन्स बजावण्यात आले आहे. आज दुपारी बारा वाजता मुंबई पोलीस मुख्यालयात त्यांना हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. 

काही दिवसांपूर्वी रिपब्लिक चॅनेलवर हंसा कंपनीचा एक रिपोर्ट प्रसारीत करण्यात आला होता. या रिपोर्ट संदर्भात रिपब्लिक टीव्हीच्या दोन जणांना समन्स बजावण्यात आलं आहे. क्राईम इंटेलिजन्स यूनिटनं काही दिवसांपूर्वी हंसा कंपनीचा कर्मचारी विशाल भंडारीला अटक केली होती. दरम्यान याप्रकरणी क्राईम ब्रांचकडूनही चौकशी सुरू आहे. 

दरम्यान, रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनाही मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 'पूछता है भारत' शो मध्ये समाजामध्ये तेढ निर्माण केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यांमध्ये अटक का करू नये, अशी विचारणा केली आहे.

मुंबई पोलिसांनी बजावलेल्या नोटीशीवर अर्णब गोस्वामी यांना प्रक्षोभक वक्तव्य करणार नाही, असे लेखी बंधपत्र द्यावे लागणार आहे. तसेच १० लाख रुपये जामिनासाठी भरावे लागणार आहेत. जामीनदार अर्णब यांच्यावर यापुढे बोलणे आणि वागण्यावर नियंत्रण ठेवणारे हवेत, असेही नोटीशीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे रिपब्लिक टीव्हीच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. 

रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांची बुधवारी मुंबई पोलिसांनी चौकशी केली. दुपारी अडीचच्या सुमारास गोस्वामी एनएम जोशी मार्ग पोलीस स्टेशनला पोहोचले. सुमारे दोन तास त्यांची चौकशी करण्यात आली. त्याआधी पोलीस अधिकाऱ्यांनी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) एस. के. सुंदरम यांची चौकशी केली.

गोस्वामी यांनी बुधवारी सांगितले की माझ्यावर दाखल केलेले सर्व खटले खोटे आहेत. गोस्वामी म्हणाले, "मला दुपारी दोन वाजता बोलविण्यात आले, परंतु ३ वाजेपर्यंत पोलीस ठाण्याबाहेर उभे करुन ठेवले होते. तसेच सकाळी ११ वाजल्यापासून माझा सीएफओ एस. सुंदरम याची चौकशी केली जात आहे, मला माझ्या सीएफओची चिंता आहे. कोरोना युगात इतकी लांब चौकशी केली जात आहे. "

अर्णब गोस्वामी यांच्यावर दोन एफआयआर नोंदविण्यात आले आहेत. आपल्या एका टीव्ही प्रोग्रामद्वारे जातीय अशांतता निर्माण केल्याबद्दल २९ एप्रिल रोजी गोस्वामी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. कोरोना लॉकडाऊनच्या वेळी वांद्रे रेल्वे टर्मिनसच्या बाहेर मोठ्या संख्येने स्थलांतरित कामगार एकत्रित करण्याविषयी एका बातमी कार्यक्रमात भडकाऊ भाष्य केल्याच्या आरोपाबाबत आणखी एक एफआयआर दाखल केला गेला आहे.

अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात एफआयआर, आयपीसी कलम १५३ (दंगा भडकावण्याच्या उद्देशाने), १२० बी (गुन्हेगारी कट रचणे), १५३ ए (विविध गटांमधील वैर वाढविणारे), २९५ ए (कोणत्याही प्रकारच्या नागरिकांच्या धार्मिक भावना चिथावणी देणे), ५०५ (मानहानी), ५०३ (२) (स्टेटमेन्ट बनविणे किंवा रेकॉर्ड करणे). नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.