मुंबई : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर आता पुढची रणनीती ठरवण्यासाठी, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. सत्तास्थापनेसाठीच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या बैठका अपेक्षित आहेत. शिवसेनेचे सगळे आमदार अजूनही मुंबईतल्या मढ इथल्या हॉटेल रिट्रीटमध्येच आहेत.
आता हे सगळे आमदार आपल्या मतदारसंघात परतण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादीची सकाळी १० वाजता यशवतंराव चव्हाण केंद्रात बैठक होत आहे. या शिवाय काँग्रेसच्या घडामोडींकडेही लक्ष असणार आहे.
काल राष्ट्रवादीला बहुमत सिद्ध करण्यासाठी रात्री साठेआठ पर्यंतची वेळ दिली होती, पण त्याआधी राष्ट्रवादीने सत्तास्थापनेसाठी आम्हाला मुदत वाढवून द्या, असं पत्र राज्यपालांना दिलं.
यानंतर राज्यपालांनी महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे दिली. त्याच वेळी केंद्रीय मंत्रिमंडळाने देखील महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली. यानंतर काल सायंकाळी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.