कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुंबईतील झोपडपट्ट्यांना धोका, आरोग्य तज्ज्ञांचा इशारा

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट काही प्रमाणात नियंत्रणात आली असली तरी तिसर्‍या लाटेचा इशारा सर्वाधिक धोका झोपडपट्टीला असल्याचा इशारा आरोग्य तज्ज्ञांकडून देण्यात आलाय. 

Updated: May 31, 2021, 07:08 PM IST
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुंबईतील झोपडपट्ट्यांना धोका, आरोग्य तज्ज्ञांचा इशारा title=

कृष्णात पाटील, मुंबई : मुंबईत कोरोनाची दुसरी लाट काही प्रमाणात नियंत्रणात आली असली तरी तिसर्‍या लाटेचा इशारा सर्वाधिक धोका झोपडपट्टीला असल्याचा इशारा आरोग्य तज्ज्ञांकडून देण्यात आलाय. त्यामुळे पालिकेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेंतर्गत पुन्हा एकदा घरोघरी सर्वेक्षण, तपासणी, औषधोपचार आणि जनजागृती करण्याचा निर्णय घेतलाय.

तिसरी लाट तारीख सांगून येणार नाही. असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. पण आतापासून काळजी घेतली तर तिसरी लाट रोखता येईल. असं आवाहन ही त्यांनी केलं. आरोग्य तज्ज्ञांच्या इशार्‍यानंतर पालिकेच्या वरीष्ठ अधिकार्‍यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. 

झोपडपट्टीला असणार्‍या धोक्याच्या पार्श्वभूमीवर चार पातळीवर नियोजन सुरू करण्यात आले आहे. यामध्ये पायाभूत सुविधा, मनुष्यबळ, औषधे आणि आवश्यक वैद्यकीय आणि सर्व प्रकारची यंत्रसामग्री तैनात ठेवण्यात येणार आहे. 

दुसर्‍या लाटेत माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेतील नोंदींनुसार सहव्याधी असणारे, ज्येष्ठांची तपासणीही यात केली जाणार आहे. दुस-या लाटेत झोपडपट्टया वाचल्या असल्या तरी तिस-या लाटेत झोपडपट्यांमध्ये मात्र कोरोनाचा संसर्ग अधिक वाढण्याची शक्यता आहे. तसंच कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर बालरोग तज्ज्ञांना महानगरपालिका २४ वॉर्डमध्ये विशेष प्रशिक्षण देणार आहे.

-  गेल्या वर्षी पहिल्या लाटेत 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहीम राबवण्यात आली. यामध्ये आरोग्य कर्मचार्‍यांनी मुंबईतील घरोघरी जाऊन ऑक्सिजन लेव्हल तपासणे, ताप तपासणे, चाचणी, सहव्याधींची माहिती, ज्येष्ठांची माहिती घेऊन आवश्यक उपाययोजना, लक्षणे असलेल्यांना क्वारंटाइन करण्यात आले. तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर अशाच प्रकारे काम करण्यात येणार आहे.

- झोपडपट्टीतील सार्वजनिक शौचालये, जागा, हॉल यांचे सॅनिटायझेशन, पावसाळी आजारांच्या पार्श्वभूमीवर निर्जंतुकीकरण, डास-डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट करणे अशी कामे केली जाणार आहेत.