गिरीश महाजन यांना मोक्का लावण्याचा कट होता! विशेष सरकारी वकिलांचा खळबळजनक व्हिडिओ

गिरीश महाजन यांना अडकवण्यासाठी सरकारी वकिलांची मदत घेतली गेली, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

Updated: Mar 8, 2022, 09:01 PM IST
गिरीश महाजन यांना मोक्का लावण्याचा कट होता! विशेष सरकारी वकिलांचा खळबळजनक व्हिडिओ title=

मुंबई :  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सरकारवर तुफान हल्लाबोल केला. माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर कशाप्रकारे खोटा गुन्हा दाखल करण्यात आला, गिरीश महाजन यांच्यावर मोका लावण्याचा कट होता, त्यासाठी सरकारी वकिलांची कशी मदत घेतली गेली, फडणवीसांसह भाजपच्या प्रमुख नेत्यांना संपवण्याचं कसं षडयंत्र आहे, याचे खळबळजनक पुरावे फडणवीसांनी थेट विधानसभा अध्यक्षांनाच दिले. 

त्यासाठी विशेष सरकारी वकील प्रवीण पंडित चव्हाण यांच्या सभाषणाचे व्हिडीओ फडणवीसांनी विधानसभा अध्यक्षांकडे सोपवले आणि या सगळ्या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी फडणवीसांनी केली आहे. 

विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाणांच्या मदतीनं गिरीश महाजनांवर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत केला. तसंच अनिल गोटेंशी यासंदर्भात प्रवीण चव्हाण यांचं बोलणं झाल्याचाही आरोप केला. 

गिरीश महाजन यांच्या विरोधात कट कसा रचायचा हे सरकारी वकिल व्हिडिओमध्ये सांगत असल्याचा पुरावा फडणवीस यांनी दिला आहे. यात सरकारी वकील म्हणतायत, 'आम्हाला पैसा निलेश पुरवायचा, गुंडागर्दी करणे, दहशत पसरविणे असे सांगायचं. सट्ट्याच्या पैशातून मोक्का लागत नाही. पण, सट्ट्याच्या पैशातून ड्रग्ज म्हटले की मोक्का लागेल. 1 ग्रॅमला १ लाख रूपये मिळतात, असं सांगायचं.

दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये सरकारी वकिल म्हणतायत, तो गिरीश महाजन यांचे नाव घ्यायला तयार आहे ना? एक छोटा जबाब तयार करतो. तो माफीचा साक्षीदार व्हायला तयार आहे का? ड्रग्जचे नाव घेतले की, आपला मोक्का एकदम फिट बसतो. आणि ड्रग्ज सापडलेच पाहिजे, असे कुठे आहे? सापडले तरच गुन्हेगार असतो, असे नाही. केवळ संशय क्रिएट करणे पुरेसे. शिक्षण संस्था आहे, तेथे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मार्केट खूप मोठे आहे, असे सांगायचे. त्याला पैसे दिले आहेत ना आपण?सुनील गायकवाड, महेंद्र बागुल, सूर्यवंशी. रवि शिंदेने त्याचे नाथाभाऊंशी बोलणे करून दिले. संस्था आपल्या ताब्यात आहे तोवर कोट्यवधी रुपये कमवू शकतो, असे भासवायचं, आणि गिरीश महाजनला फसवायचं, असं संभाषण या व्हिडिओत आहे.

प्रवीण चव्हाण यांनी फेटाळले आरोप
यासंदर्भात सरकारी वकिली प्रवीण चव्हाण यांना विचारलं असता त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. कार्यालयातील कुणीतरी खोडसाळपणा करुन ही क्लिप व्हायरल केलेली आहे असं प्रवीण चव्हाण यांनी म्हटलं आहे. आता अनिल गोटे कार्यालयात आले होते, पण ते त्यांच्या केससंबंधात आले होते, असं प्रवीण चव्हाण यांनी म्हटलं आहे.