मुंबई : पावसाने आज महाराष्ट्रात दांडी मारल्याची दिसून येत आहे. मुंबईत तर कोरडाच मान्सून दाखल झाला आहे. मात्र, त्याचवेळी उत्तर भारतात पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. महाराष्ट्राला काल चिंब भिजवल्यानंतर आज पावसानं दांडी मारली आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. हवामान विभागाने मान्सून दाखल झाल्याचे जाहीर केले. मात्र असं असलं तरी मुंबईत अजूनही म्हणावा तसा पाऊस बरसलेला नाही. त्यामुळे मुंबईकरांना पावसाची मज्जाच घेता आलेली नाही.
महाराष्ट्रभरातून पाऊस गायब झालाय. मुंबईत मान्सून आलाय, पण कोरडाच मान्सून आहे. पाऊस आलाच नाही. तर दुसरीकडे उत्तर भारतात पावसाने धुमाकूळ घातला आहे. उत्तर प्रदेशातल्या बलरामपूरमध्ये अँब्युलन्स पुराच्या पाण्यात अडकली होती. बलरामपूरमध्ये गेल्या १८ तासांपासून सतत पाऊस सुरू आहे. सुदैव एवढंच की या रुग्णवाहिकेत रुग्ण नव्हता. बऱ्याच तासांच्या प्रयत्नांनंतर या रुग्णवाहिकेला बाहेर काढण्यात यश आलं. तर उत्तर प्रदेशातल्या कुशीनगरमध्ये एक स्कूलबस पाण्यात अडकली होती.