मुंबई : राफेल प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांना क्लीन चिट देण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही जेपीसीची मागणी केलीय. ती आमची स्पष्ट भूमिका आहे. तारिक अन्वर यांनी टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोलायला हवं होतं. त्यांचा हा निर्णय पाहाता त्यांनी तो आता घेतलाय असं वाटत नाहीये. हे त्यांनी निमित्त ठरवलंय, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केलेय.
दरम्यान, राफेल विमान खरेदीप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुठेही क्लीन चीट दिलेली नाही. प्रसारमाध्यमांनी शरद पवारांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. तसेच तारिक अन्वर यांच्या मनात काही तरी वेगळं सुरु असावं, ज्याची त्यांनी आधीच तयारी करून ठेवली असावी. व्यापक दृष्टिकोन बाळगून आम्ही काँग्रेसबरोबर आहोत. काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंदमध्ये राष्ट्रीय पक्षांमध्ये सगळ्यात पहिले आम्ही सहभागी झालो होतो. काँग्रेसच्या प्रत्येक मोर्चात आम्ही सहभागी झालं पाहिजे, असं काही नाही, असे पटेल म्हणालेत.
पवारांनी मोदींची बाजू घेतल्याने पक्षात नाराजीचा सूर दिसून आला. पवारांच्या विधानामुळे नाराज झालेल्या तारिक अन्वर यांनी पक्षाचा आणि खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर पवारांचे जवळचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी अन्वर यांना जोरदार टोला लगावलाय. अन्वर यांनी पवार यांच्या विधानावरुन राजीनामा दिलेला नाही. त्यांच्या डोक्यात आधीपासून काहीतरी चाललेले होते. त्यामुळे त्यांनी तसा निर्णय घेतलाय, असे पटेल म्हणालेत.
राफेल प्रश्नाबाबत बोलत असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, मोदींच्या हेतूबद्दल जनतेच्या मनात शंका नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे वेगळी भूमिका समोर आली. भाजपच्या विरोधात रान उठले असताना पवारांनी अशी भूमिका कशी काय मांडली, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झालेय. त्यांच्या या विधानामुळे नाराज झालेल्या तारीक अन्वर यांनी पक्षाचा आणि खासदारकीचा राजीनामा दिला आहे.