मुंबई : आज सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणासाठी नवा मार्ग दाखवला असं वक्यव्य केलं. मुख्यमंत्र्यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला संबोधित केलं. मुख्यमंत्री म्हणाले, 'कोरोनाविरोधाच्या लढाईसोबत मराठा आरक्षणाच्या हक्काची लढाई देखील राज्य लढत आहे. पण ही लढाई संपलेली नाही. कोर्टाने निराशाजनक निकाल दिला तरी, निराश झाला तो महाराष्ट्र कसला... '
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, 'मराठा आरक्षणाचा निर्णय हा सर्व पक्षांनी घेतला होता. मराठा आरक्षणाची लढाई आम्ही उच्च न्यायालयात जिंकलो. पण सुप्रीम कोर्टाने मात्र निराशाजनक निकाल दिला. उच्च न्यायालयात ज्या वकिलांनी बाजू मांडली. त्याच वकिलांनी आणि त्यांच्याबरोबर आणखी काही वकिलांना नियुक्त करुन सर्वांनी मिळून सुप्रीम कोर्टात बाजू मांडली. '
'हा निर्णय माझ्या मराठा समाजाच्या बांधवांनी ऐकला कोणत्याही प्रकारचा थयथयाट केला नाही. त्यामुळे मी त्यांचे धन्यवाद मानतो. विशेष करुन छत्रपती संभाजीराजे यांनी अत्यंत समजंसपणे प्रतिक्रिया दिली.' शिवाय मराठा आरक्षणावर आता केंद्राने निर्णय द्यावा असं देखील मुख्यमंत्री याठिकाणी म्हणाले.
'सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणासाठी निराशाजनक निकाल देवून नवा मार्ग दाखवला आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारचा नाही. त्यामुळे केंद्र सरकार आणि राष्ट्रपती यांना हा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्यासाठी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना भेटावं लागलं तरी भेटू. मराठा अरक्षणासाठी वकिलांची एक फौज तयार करण्यात असून त्यावर आभ्यास सुरू आहे.' असं देखील मुख्यमंत्री म्हणाले.