राज्यपालांच्या वादावर काँग्रेसने केली ही कणखर मागणी

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्रात नवा वाद सुरु झालाय. राज्यपालांच्या या वक्तव्यावरून काँग्रेसने अधिक कणखर भूमिका घेतलीय.

Updated: Feb 28, 2022, 04:21 PM IST
राज्यपालांच्या वादावर काँग्रेसने केली ही कणखर मागणी title=

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला. रामदास स्वामी नसते तर शिवाजीला कोण विचारले असते? असे विधान केले. यावरून काँग्रेसने राज्यपाल कोश्यारी यांच्यावर टीका केलीय. राज्यपालांनी आपले विधान मागे घेत महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत असून जगभरात त्यांचा मोठा नावलौकिक आहे. परंतु, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात वाढलेल्या कोश्यारी यांनी छत्रपतींचा केलेला अपमान महाराष्ट्र कदापी सहन करणार नाही.

रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु नव्हते. मात्र, काही विशिष्ट इतिहासकारांकडून इतिहासाची मोडतोड करुन रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु असल्याचे बिंबवण्याचा प्रयत्न मागील काही वर्षात जाणीवपूर्वक केला जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे कतृत्व व त्यांची किर्ती महान आहे. त्यांच्या पराक्रमाची महती सातासमुद्रापार आहे. परंतु, रामदास स्वामींना महाराजांचा गुरु दाखवून बुद्धीभेद केला जात आहे. 

भगतसिंह कोश्यारी हे घटनात्मक पदावर बसून इतिहासाची मोडतोड करण्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करत आहेत. अशा व्यक्तीला राज्यपालपदावर बसण्याचा नैतिक अधिकार नाही, केंद्र सरकारने त्यांना परत बोलवावे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली. 

भारतीय जनता पक्ष छत्रपती शिवाजी महाराज यांचा वापर मताची पोळी भाजण्यासाठी करत असतो. मागील आठवड्यात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनीही शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होत असताना राज्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते गप्प कसे बसतात असा सवाल उपस्थित करुन ते महाराष्ट्रद्रोही असल्याचे दाखवून देत आहेत असे नाना पटोले म्हणाले.