एल अॅण्ड टी कंपनी विरोधात गुन्हा दाखल होणार

पवई येथील एल अॅण्ड टी या कंपनीविरोधात जमिनीच्या गैरवापर केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला जाईल, असं आश्वासन सरकारने आज विधानसभेत दिले. 

Updated: Aug 11, 2017, 03:51 PM IST
एल अॅण्ड टी कंपनी विरोधात गुन्हा दाखल होणार title=

दीपक भातुसे / मुंबई : पवई येथील एल अॅण्ड टी या कंपनीविरोधात जमिनीच्या गैरवापर केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला जाईल, असं आश्वासन सरकारने आज विधानसभेत दिले. 
एल अॅण्ड टीने औद्योगिक जागेवर रहिवाशी इमारती उभ्या केल्याप्रकरणी काँग्रेसचे आमदार नसीम खान यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. याप्रकरणी एल अॅण्ड टी कंपनीचे संचालक, तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांविरोधातही गुन्हा दाखल केला जाईल, असं सरकारने विधानसभेत सांगितलं.

१९७६ साली युएलसी कायदा लागू झाल्यानंतर कंपनीची अतिरिक्त जमीन शासन जमा केली जाणार होती. मात्र तेव्हा कंपनीने या जागेचा वापर औद्योगिक कारणासाठी केला जाईल अशी हमी शासनाला दिली होती. 

मात्र कंपनीने मागील काही वर्षांपूर्वी महापालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून या ठिकाणी ८ रहिवाशी टॉवर उभे केले आहेत. ४ लाख ४ हजार चौरस मीटरचा हा भूखंड असून यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाल्याचा दावा विधानसभेत करण्यात आला होता.