ठाण्यातून धक्कादायक बातमी! छत्रपती शिवाजी महाराज सरकारी रुग्णालयात 18 रुग्णांचा मृत्यू

Chhatrapati Shivaji Maharaj Hospital : ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्रीत तब्बल 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

आकाश नेटके | Updated: Aug 13, 2023, 01:49 PM IST
ठाण्यातून धक्कादायक बातमी! छत्रपती शिवाजी महाराज सरकारी रुग्णालयात 18 रुग्णांचा मृत्यू title=

Thane News : ठाणे महापालिकेच्या (TMC) कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात (chhatrapati shivaji maharaj hospital) गुरुवारी दिवसभरात पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र याबाबत अद्याप रुग्णालय प्रशासनाने कोणतीही माहिती दिलेली नाही. दोनच दिवसांपूर्वी पाच जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी गोंधळ घातला होता. आमदार जितेंद्र आव्हाडांनी (jitendra awhad) सुद्धा रुग्णालयात धाव घेत प्राशसनाला धारेवर धरले होते. त्यानंतर गेल्या 12 तासांत 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून पुन्हा एकदा कळवा रुग्णालय चर्चेत आला आहे.

ठाण्याचे जिल्हा शासकीय रुग्णालय नुतनीकरणासाठी दोन महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे इथे जाणाऱ्या रुग्णांचा सगळा भार हा छत्रपती शिवाजी महाराज सरकारी रुग्णालयावर पडत आहे.अशातच अपुरी डॉक्टर क्षमता आणि रुग्णांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ यामुळे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्री 18 जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.  मृत्यू झालेल्या 18 पैकी 13 रुग्ण हे आयसीयूमधील तर 4 रुग्ण जनरल वॉर्डमधील होते. 

दरम्यान, तीनच दिवसांपूर्वी याच रुग्णालयात एकाच दिवशी पाच रुग्णांचा मृत्यू झाला होता. या सर्व प्रकारानंतर ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या अनागोंदी कारभार समोर आला होता. वेळेत उपचार न मिळाल्याने रुग्णालयातील पाच जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईंकाकडून करण्यात येत होता. एका रुग्णाचा हृदयविकाराच्या झटक्याने, उलटी झाल्याने एका रुग्णाचा, एक अज्ञात आणि एका रुग्णाच्या पायाला गळू झाला होता. तर यामध्ये एका गरोदर महिलेचाही मृत्यू झाला होता. 

गेल्याच महिन्यात मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुपर स्पेशलिटी कॅन्सर रुग्णालयाचे भूमिपूजन ठाण्यात केले होते. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत पाडून त्या ठिकाणी देखील मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येत आहे. मात्र हे करत असताना सर्वात जुने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय दुर्लक्षित झाले आहे का असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. 

शेवटच्या क्षणी रुग्णालयात दाखल केल्याचा प्रशासनानं दावा

शनिवार रात्री 10.30 ते रविवार सकाळी 8.30 यादरम्यान रुग्णालयातील 18 रुग्ण दगावले आहेत. त्यातील 13 रुग्णांवर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात तर चार रुग्णांवर सामान्य कक्षात उपचार सुरू होते. यातील काही रुग्ण खासगी रुग्णालयामधून अतिशय अत्यवस्थ अवस्थेत शेवटच्या क्षणी येथे उपचारासाठी दाखल झाले होते. तर, काही रुग्णांचे वय 80 पेक्षा जास्त असल्याने  त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

17 जणांच्या मृत्यूची जबाबदारी कोणीतरी घ्यायला हवी - जितेंद्र आव्हाड

"आज सकाळी उठताच पत्रकारांचे फोन आले की, कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 17 रुग्ण दगावले. अतिशय वाईट बातमी आहे. पण याची गांभीर्याने दखल ठाणे महानगर पालिका प्रशासन घेईल असे मला काही वाटत नाही. परवा 2 दिवसांपूर्वीचे प्रकरण जर गांभीर्याने घेतलं असत तर आज हे घडलं नसतं. आज टीव्हीसमोर पुढे येऊन काहीजण त्यांची बाजू घेताना दिसत आहेत हे दुर्देव आहेत. जे गेले त्यांच्या घरच्यांना काय वाटत असेल; याची जराही भिती, खंत हॉस्पिटलची बाजू घेणाऱ्यांच्या मनात दिसत नाही. प्रशासनाला याचा जाब विचारायलाच पाहिजे. तसेच या 17 जणांच्या मृत्यूची जबाबदारी कोणीतरी घ्यायला हवी. या संपूर्ण प्रकरणाची तसेच हॉस्पिटलने संपूर्ण हॉस्पिटलचे ऑडिट करून जाहीर करावे अशी राष्ट्रवादी कांग्रेस मागणी करत आहोत, असे ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.