ठाकरे सरकार 2 टप्प्यांमध्ये देणार शेतकरी कर्जमाफी?

 शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन

Updated: Dec 17, 2019, 11:29 PM IST
ठाकरे सरकार 2 टप्प्यांमध्ये देणार शेतकरी कर्जमाफी? title=

दीपक भातुसे, झी मीडिया, नागपूर : महाआघाडी सरकारने शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन केली आहे. ठाकरे सरकार 2 टप्प्यांमध्ये शेतकरी कर्जमाफी करणार आहे. पहिला टप्पा आर्थिक वर्ष संपायच्या आत म्हणजेच मार्च 2020 च्या आधी होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील कर्जमाफी ही एप्रिल 2020 पर्यंत होणार आहे. कर्जमाफीचा आढावा घेण्यासाठी ठाकरे सरकारने एक समिती नियुक्ती केली आहे. ही टीम नियमित आढावा घेणार आहे. बँकांकडून सरकारने शेतकरी कर्जमाफीबाबत माहिती मागवली आहे.

नागपूरमध्ये सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आजचा दिवस गाजला तो शिवसेना आणि भाजप आमदारांनी एकमेकांना केलेल्या धक्काबुक्कीमुळं... शिवाय शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मागणीवरून तसंच शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत देण्याच्या मागणीवरून विरोधकांनी सभागृहात तसंच पायऱ्यांवर जोरदार गोंधळ घातला.

भाजपनं आज शेतकऱ्यांना मदतीच्या मुद्यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांना कर्जमाफी तसंच हेक्टर २५ हजार रुपयांची मदत देण्याच्या मागणीसाठी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. तसंच दोन्ही सभागृहात गोंधळ घातला. दरम्यान, शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली. शिमगा करायचा असेल तर दिल्लीत भाजपचं सरकार आहे तिकडे जाऊन करा असा टोलाही उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला आहे.