मुंबई : दिल्ली पोलिसांनी मंगळवारी दहशतवाद्यांच्या मोठ्या कटाचा पर्दाफाश केला आणि 6 संशयितांना अटक केली. सणासुदीच्या काळात घातपात घडवण्याचा या दहशतवाद्यांचा कट असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.
अटक केलेल्या संशयित दहशतवाद्यांमध्ये जीशान, ओसामा, अमीर जावेद, जान मोहम्मद, मूलचंद उर्फलाला आणि अबू बकर यांचा समावेश आहे. स्पेशल सेलने दिल्ली, महाराष्ट्रसह यूपीच्या वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून त्यांना अटक केली. अटक केलेले संशयित कुठे राहत होते, काय करत होते याची माहिती आता समोर आली आहे
जीशान कमर : 28 वर्षांच्या जीशान कमरला उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आली. जीशानने एमबीए केलं आहे आणि दुबईमध्ये त्याने अकाऊंटंट म्हमून कामही केलं आहे. कोरोना काळात लॉकडाऊन लागल्यानंतर तो आपल्या घरी परतला होता. आणि इथे तो खजुराचा व्यवसाय करत होता.
आमिर जावेद : यूपीमधील लखनौ इथून आमिर जावेदला अटक करण्यात आली. 31 वर्षांचा आमिर जावेद हा जीशानचा नातेवाईक आहे. आमिरने अनेक वर्षे सौदी अरेबियाच्या जेद्दा इथं काम केलं आहे. तो धार्मिक शिक्षणही देत होता. आमिर जावेदचे वडील आणि भावाला अद्याप विश्वास नाही की त्यांच्या मुलाचे अंडरवर्ल्ड किंवा दहशतवादी संबंध आहेत. आमिरचं अडीच वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. कुटुंबातील सदस्य सांगतात की मुलगा काम करायचा. सकाळी कामावर जायचा आणि संध्याकाळी सरळ घरी यायचा.
जान मोहम्मद : जान मोहम्मद शेख 47 वर्षांचा असून तो व्यवसायाने चालक आहे. जान मोहम्मद शेख उर्फ समीरला 2001 मध्ये एका हल्ल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. जान मोहम्मदचं कुटुंब मुंबईच्या सायन भागात राहतं. अनेक वर्षांपासून ते इथं वास्तव्याला आहेत. साधारण दहा वर्षांपूर्वी त्याच्या आई-वडिलांचं निधन झालं.
मूलचंद उर्फ लाला : लालाचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचं सांगण्यात येत आहे, 47 वर्षांचा लाला हा डी-कंपनीच्या संपर्कात होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे, भारतात तो शेती करत होता.
अबू बकर : काही वर्ष तो जेद्दा इथं काम करत होता, त्यानं तो भारतात परत आला. 2013 मध्ये त्याने देवबंद इथल्या मदरशात शिक्षण घेतलं. अबू बकर (वय 23 वर्षे) त्याचा भाऊ मोहम्मद उमरसोबत बहराइचच्या कैसरगंज भागात राहत होता. त्याचे वडील सुन्ना खान गेल्या अनेक वर्षांपासून सौदीच्या जेद्दा शहरात राहत आहेत. अबू बकर विवाहित असून त्याला एक मुलगी आहे.
ओसामा : दिल्लीतून अटक करण्यात आलेल्या ओसामाचं कुटुंब ड्रायफ्रूट्सचा व्यवसाय करतात. यामुळे, ओसामा (वय 22 वर्षे) अनेक वेळा व्यवसायानिमित्त मध्य पूर्वेच्या देशांमध्ये जात असे. ओसामा मस्कतला दहशतवादी प्रशिक्षणासाठी गेला आणि त्यानंतर समुद्रमार्गे तो पाकिस्तानात पोहोचला.
मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले दहशतवादी पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय आणि अंडरवर्ल्डच्या दहशतवादी कटात त्यांना पाठिंबा देत होते. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम या अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या माध्यमातून भारताला हादरवून टाकण्याचा प्रयत्न करत होता.