मुंबई : Telangana Chief Minister K Chandrasekhar Rao in Mumbai : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी. बिगर भाजपशासित राज्यांतील सरकारांना भाजप केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून वारंवार त्रास देत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. आता भाजपविरोधात जोरदार मोर्चेबांधणी करण्यावर भर देण्यात येत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्राचा दौरा केला होता. आता तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव ( K Chandrasekhar Rao) आज मुंबई दौऱ्यावर आहेत.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर हे मुख्यमंत्री उद्धव ठकारे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. भाजपविरोधात मोट बांधण्याच्यादृष्टीने ही भेट महत्वाची मानली जात आहे. दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री, 4 वाजता शरद पवार यांची भेट घेणार आहेत.
ममता बॅनर्जी यांच्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेट घेत असल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु झाली आहे. भाजपविरोधात राष्ट्रीय पातळीवर मोट बांधण्याच्या दृष्टीने या भेटीकडे पाहिलं जात आहे.
तीन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी के चंद्रशेखर राव यांना फोन करून त्यांच्या मोदीविरोधी भूमिकेला पाठिंबा दिला होता आणि आजच्या भेटीचे निमंत्रण दिले होते. या निमंत्रणाचा स्विकार करत आज ते मुंबईत येत आहेत. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतील त्यानंतर 4 वाजता ते शरद पवार यांची भेट घेतील.
बिगर भाजपशासित राज्यांतील सरकारांना केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून भाजप वारंवार त्रास देत आहे. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या राज्यांना त्रास दिला जात आहे, असा शिवसेनेकडून आरोप करण्यात आला आहे. आता या बिगर भाजपशासित राज्यांना एकत्र करण्याच्या प्रयत्नांना सुरूवात झाली आहे. यामुळे भाजपविरोधात लढण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर एकजूट निर्माण करून भाजपला नामोहरण करण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.
त्याआधीच पंतप्रधान मोदी सरकारच्या विरोधात तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी दंड थोपटले आहेत. त्यामुळे आज्या भेटीनंतर ते पुढची दिशा काय ठरवतात, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, त्यांच्या पुढच्या लढ्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी असणार का याची उत्सुकता आहे.