शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पुढं ढकलली

Updated: May 14, 2018, 08:38 PM IST

मुंबई : शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निडवणुका पुढे ढकलण्याची आमदार कपिल पाटील यांची मागणी मुख्य निवडणूक आयुक्तांनी मान्य केली. त्यामुळे आता १८ जून नंतर निवडणुका होणार असून या संदर्भातील तारीख लवकरच जाहीर होईल.

ऐन मे महिन्याच्या सुट्टीत ८ जूनला लागलेल्या शिक्षक व पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात अशी मागणी मुंबई शिक्षक मतदार संघाचे आमदार कपिल पाटील यांनी दिल्लीत भारत निर्वाचन आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांना निवेदन देऊन केली होती. 

मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधर या चारही निवृत्त होणाऱ्या विद्यमान विधान परिषद सदस्यांची मुदत ७ जुलै २०१८ रोजी संपत आहे. मागच्या टर्मची (२०१२) निवडणूक २ जुलै २०१२ रोजी झाली होती. त्यापूर्वी २००६ मध्येही असाच प्रकार झाला होता.

८ जून २००६ ला निवडणूक जाहीर करण्यात आली होती. त्यावेळीही शिक्षक भारतीने दिल्लीत जाऊन निवडणूक आयोगाला वस्तुस्थिती सांगितली होती. त्यानंतर तारीख बदलून २४ जून २००६ रोजी निवडणूक घेण्यात आली होती. 

मे महिन्याच्या सुट्टीमुळे शिक्षक आपापल्या गावी किंवा बाहेरगावी कुटुंबासमवेत गेले आहेत. मुंबईसह अन्य शहरांमध्येही ही स्थिती आहे. बहुतांश लोक मुलांना सुट्टी असल्यामुळे आपापल्या गावी किंवा पर्यटनासाठी बाहेर जातात. त्यामुळे मतदार संघातील मतदारांना मतदानाला परत येणे निव्वळ अशक्य आहे. त्यामुळे निवडणुका शाळा, कॉलेज सुरु झाल्यानंतर घेण्यात याव्यात अशी मागणी शिक्षक भारती केली होती.