मुंबई : आज सायंकाळच्या सुमारास मंत्रालयाच्या इमारतीवरून खाली पडून हर्षल रावते हा तरुण गंभीररित्या जखमी झाला होता. या तरुणाचा मृत्यू झाल्याचं समजतंय. त्याला रुग्णालयात नेण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.
घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ त्याला रुग्णवाहिकेतून हॉस्पीटलमध्ये हलवलं होतं. ही घटना समजल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, जयंत पाटील घटनास्थळी दाखल झाले. धर्मा पाटील प्रकरणानंतरही सरकारला जाग आलेली नाही, असं त्यांनी यावेळी म्हटलंय. हर्षलनं आत्महत्या केल्याचा दावा करत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केलीय.
हर्षल रावते असं या ४५ वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो पैठणचा रहिवासी आहे. चेंबूरच्या जैन मंदिरावळ सध्या तो राहतो, असं त्याच्या कागदपत्रांवरून समोर येतंय.
इमारतीवरून खाली पडल्यानंतर पोलिसांना त्याच्या खिशात एक चिठ्ठीही सापडल्याचा दावा केला जातोय.
हर्षलनं आत्महत्येचा प्रयत्न केला की तो इमारतीवरून खाली पडला याबद्दल संभ्रम निर्माण झालाय. याचं कारण म्हणजे, हर्षलनं आत्महत्येचा प्रयत्न केला नाही तर तो इमारतीवरून खाली पडला असा दावा सरकारनं केलाय. महत्त्वाचं म्हणजे, हर्षल याला प्रत्यक्षदर्शींनी केवळ खाली पडताना पाहिलंय.
मेहुणीच्या खून प्रकरणी हर्षलला शिक्षा झाली होती. पैठणच्या तुरुंगात तो चार-पाच वर्षांपासून शिक्षा भोगत होता. सध्या तो पॅरोलवर बाहेर होता. परंतु, हर्षलची तुरुंगातील वर्तवणूक चांगली होती, अशीही माहिती हाती येतेय.
काही दिवसांपूर्वी धुळ्याच्या धर्मा पाटील या शेतकऱ्यांनं मंत्रालयातच विष घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना घटना घडली होती. त्यानंतर मंत्रालयात दाद मागण्यासाठी आलेल्या आणखी एका शेतकऱ्याजवळ पोलिसांना विषाची बाटली आढळली होती. शिवाय, कालच एका उच्च शिक्षित तरुणानं मंत्रालयासमोर पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.