मुंबई : राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आज विधानसभेत 2018-19 या अर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्याआधी सकाळी अर्थमंत्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेतील. काल राज्याचं आर्थिक सर्वेक्षण विधानसभेत मांडण्यात आलं.
त्यानुसार दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत महाराष्ट्रानं कर्नाटकला मागे टाकल्याचं आकडेवारीतून स्पष्ट करण्यात आलंय. शिवाय गेल्या चार वर्षात राज्यावर असणाऱ्या कर्जाचा बोजाही कमी झाल्याचा दावा करण्यात आलाय. राज्याचं सकल उत्पन्न साधारण 24 लाख 95 हजार कोटींच्या घरात असून विकासदर 7.3% असल्याचं आर्थिक सर्वेक्षणातून पुढे आलं आहे.
देशभरात जीएसटी करप्रणाली लागू झाल्यानंतर अर्थसंकल्पातून कर कमी जास्त होण्याची शक्यता मावळलीय. राज्यातील कृषी क्षेत्राची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही. हमी भावाच्या प्रश्नावरून वारंवार शेतकऱ्यांची निराशा होतेय.. त्यातच केंद्र सरकारनं दीडपट हमीभावाची घोषणा केलीय. ही घोषणा लक्षात घेऊन राज्य सरकार त्याविषयी काय तरतूद करतंय याकडे कृषी क्षेत्राचं लक्ष आहे.