मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाजपाला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले. त्यानंतर पक्षाची पुढची रणनीती ठरवण्यासाठी भाजपाच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक दुपारी १२ वाजता सुरु झाली. काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. या बैठकीनंतर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सत्तास्थापनेच्या चर्चेविषयी बोलणे टाळले. संध्याकाळी ४ वाजता पुन्हा बैठक होणार असून राज्यपालांच्या निमंत्रणावर निर्णय घेणार असल्याचे म्हटले.
सर्वात मोठा पक्ष असल्याने राज्यपालांनी आम्हाला निमंत्रण दिले. आम्ही ४ वाजता पुन्हा बैठक करु आणि काय निर्णय घ्यायचा ते ठरवू असे भाजपा नेत्यांनी म्हटले.
महाराष्ट्रात सर्वात जास्त जागा जिंकणाऱ्या भाजपाला राज्यपालांनी सरकार बनविण्याचे आमंत्रण दिले. शिवसेनाशिवाय १०५ आमदारांसोबत असलेल्या भाजपाला बहुमत मिळवण्यासाठी करण्यासाठी १४५ चा आकडा पार करावा लागणार आहे. अशावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्र येऊन सत्ता स्थापन करु शकते आणि काँग्रेस त्यांना बाहेरुन पाठींबा देईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.