मुंबई : जगात, देशात आणि राज्यात कोरोनाचं थैमान सुरु असलं तरी डॉक्टर्स आणि इतर कर्मचारी आपली जबाबदारी चोखपणे बजावत आहेत. कोरोना सारख्या संकटातही देवदुताप्रमाणे ते रुग्णांची सेवा करत आहेत. सायन रुग्णालयातील डॉक्टर्स आणि नर्सेस यांचं कौतूक करावं तितकं कमीच. कारण सायन रूग्णालयात १०० कोरोना पॉझिटिव्ह गरोदर महिलांचे यशस्वी बाळंतपण करण्यात आले आहे. महत्त्वाचं म्हणजे योग्य ती काळजी घेतल्यानं एकाही बाळामध्ये कोरोनाचे संक्रमण झालं नाही.
सर्व नवजात बालकांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. ही सर्वात महत्वाची बाब आहे. कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या धारावी, गोवंडी, मानखूर्द भागातील अधिकतर गरोदर महिला सायन रूग्णालयात दाखल होत्या. सायन रूग्णालयाच्या गायनॅक विभागात गेल्या ३ आठवड्यात १०३ कोरोनाबाधित महिलांची यशस्वी बाळंतपण केली. यात ५५ सिझेरिन तर ४८ नॉर्मल बाळंतपण करण्यात आली. आनंदाची बाब आणि निसर्गाची किमया म्हणता येईल प्रसूती झालेल्या सर्व महिलांची नवजात बालकं ही कोरोना निगेटिव्ह आहेत.
आईच्या दुधात प्रचंड ताकद असते. हे दुध नवजात शिशुकरता अमृताहून कमी नाही. बाळाची प्रचंड शक्ती वाढवण्याची ताकद या दुधामध्ये आहे. संबंधित महिलांना मास्क लावून बाळाला दूध पाजण्यासही परवानगी दिली आहे. तसेच रूग्णालयात महिलांची आणि बाळांची योग्य ती काळजी घेतली जात आहे. जिथे सगळीकडे कोरोनामुळे एक भीती, नकारात्मक विचार असताना या घटनेने सगळ्यांनाच समाधान मिळालं आहे.
धारावीत कोरोनाचे सगळ्यात जास्त रूग्ण आढळत आहेत. धारावीत एकूण कोरोना रूग्णांची संख्या ९६२ वर गेली असून एकूण ३१ जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. रविवारी ही संख्या ९१६ वर पोहोचली होती. कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे ही साखळी तोडावी तरी कशी असा मोठा प्रश्न प्रशासनासमोर आहे.