अमित जोशी, मुंबई : राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कठोर नियमांबाबत येत्या 2 दिवसात घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्यात कोरोनाचा वाढत चाललेला संसर्ग हा चिंतेचा विषय बनला आहे. अनेक वेळा आवाहन करुन ही लोकांकडून नियमांचं पालन होत नसल्याने नियम आणखी कठोर करण्याची शक्यता आहे. सरकारकडून याआधीच याबाबत संकेत देण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील याबाबत निर्देश दिले होते.
1. राज्यात पूर्ण लॉकडाऊन केले जाण्याची शक्यता कमी आहे.
2. राज्यात सार्वजनिक प्रवासी वाहतूक बंद केली जाण्याची शक्यता ही कमी आहे.
3. प्रवासी बस सेवा 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवली जाण्याची शक्यता आहे.
4. थेटर, मॉल पूर्णपणे बंद केले जाण्याची शक्यता आहे.
5. लग्न कार्यक्रमांबाबत निर्बंध अधिक कडक केले जाणार आहेत.
6. हॉटेल 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यात येतील.
7. दुकानात पाचपेक्षा जास्त व्यक्ती, गर्दी आढळल्यास अतिशय कडक कारवाई केली जाणार आहे.
8. सार्वजनिक ठिकाणी कोरोना प्रतिबंधक नियमांची अतिशय कडक पद्धतीने अंमलबजावणी करणार येणा्चर आहे.
राज्यात कोरोना रुग्णांचा वाढता आलेख हा निश्चितच चिंता वाढवणारा आहे. त्यामुळे सरकारकडून आणखी काही निर्बंध वाढवण्यात येणार आहेत. सार्वजनिक ठिकाणी लोकांकडून नियमांचं पालन होत नसल्याचं वारंवार समोर आलं आहे.
कोरोना रुग्णांचा आकडा असाच वाढत राहिला तर येणाऱ्या काळात आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण येण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. त्यामुळे शासनाने परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याआधीच काही कठोर पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे.
अनेक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत असल्याने लॉकडाऊन लावण्यात आला आहे. राज्यात रात्रीची संचारबंदी आहे. पण पुढे जावून हे नियम आता आणखी कठोर होण्याची शक्यता आहे.