एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे

एसटी कर्मचाऱ्यांना पुकारलेला संप अखेर मागे घ्यावा लागला आहे. संप बेकायदेशीर असल्याचे मत नोंदवत कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावर रुजू होण्याचे आदेश मुंबई  उच्च न्यायालयाने दिल्यानंतर एसटी कर्मचारी संघटनांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 21, 2017, 08:10 AM IST
एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे title=

मुंबई :  एसटी कर्मचाऱ्यांना पुकारलेला संप अखेर मागे घ्यावा लागला आहे. संप बेकायदेशीर असल्याचे मत नोंदवत कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावर रुजू होण्याचे आदेश मुंबई  उच्च न्यायालयाने दिल्यानंतर एसटी कर्मचारी संघटनांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी न्यायालयाने राज्य सरकारलाही फटकालेय.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर संपाची पुढची दिशा ठरविण्यासंदर्भात एसटी संघटनेची शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत बैठक सुरु होती. या बैठकीत न्यायालयाच्या आदेशाचं पालन करुन संप मागे घेण्याचा निर्णय  झाला. त्यानंतर कामगार संघटनेने एक  प्रसिद्ध पत्रक काढून हा संप मागे घेत असल्याचे म्हटले.

दरम्यान, चार दिवस चाललेला एसटी संप बेकायदेशीर असल्याचं मत न्यायालयाने नोंदवत एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसंदर्भात तातडीने राज्य सरकारला समिती स्थापन करण्याचे आदेश दिलेत. याशिवाय संघटनेशी चर्चा करण्याचेही आदेश दिल्याने संप मागे घेत आहोत, असे एसटी कर्मचारी संघटनेने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकार नमूद केले आहे.

एसटीचा सुरु असलेला संप प्रथमदर्शनी बेकायदेशीर असल्याचे मत शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले होते. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबग तोडगा काढण्यासाठी पाच सदस्यीय उच्चस्तरीय समिती नेमण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

या समितीने कर्मचाऱ्यांना अंतरिम वेतनवाढ किती द्यायची, याबाबत तीन आठवड्यांत निर्णय घ्यावा, असेही निर्देश कोर्टाने दिलेत. कोर्टाच्या या निर्णयानंतर अखेर एसटी कर्मचारी संघटनेने आपला संप घेतला. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेले लोकांचे हाल संपण्यास मदत झालेय.